ठाणे येथील रवींद्र कर्वे यांना फलटणचा ‘उष:काल सन्मान’ प्रदान; रविवारी महामहीम राज्यपालांच्या हस्ते मिळणार ‘महर्षी कर्वे पुरस्कार’
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणे येथील ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ आणि त्यांच्या ‘विद्यार्थी विकास योजने’च्या नावे एकापाठोपाठ एक मोठे बहुमान जमा होत आहेत. ‘विद्यार्थी विकास योजने’चे संस्थापक आणि प्रवर्तक रवींद्र कर्वे यांना नुकताच २८ जून रोजी फलटण येथे ‘उष:काल सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर, याच रविवारी म्हणजेच ५ जुलै रोजी त्यांना पुणे येथे राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
२८ जूनला फलटण येथे ‘उष:काल सन्मान’ संपन्न
फलटण येथील प्रसिद्ध शिक्षिका व ज्योतिष तज्ज्ञ कै. सौ. उषा दाणी-विभूते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘उष:काल प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा यंदाचा ‘उष:काल सन्मान २०२६’ रवींद्र कर्वे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. रविवार, २८ जून रोजी सकाळी फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या एका विशेष समारंभात पुणे येथील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. सुनील देवधर यांच्या शुभहस्ते कर्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला. फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सरकारी योजनेला सेवेचा अर्थ! मानसिक अस्वस्थतेवर मात करत विकास देशमुख यांनी घडवले सामाजिक परिवर्तन
५ जुलैला पुण्यात राज्यपालांच्या हस्ते होणार महागौरव
या पहिल्या पुरस्कार सोहळ्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच रवींद्र कर्वे यांच्या ‘विद्यार्थी विकास योजनेला’ दुसरा मोठा बहुमान जाहीर झाला आहे. श्रीमती नाथिभाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाच्या वतीने शिक्षण क्षेत्रासाठी प्रथमच दिला जाणारा ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कार (सन २०२५-२०२६)’ सेवा सहयोग फाउंडेशनच्या “विद्यार्थी विकास योजनेला” मिळाला आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी पुणे येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
रवींद्र कर्वे यांचे मनोगत: हे यश कार्यकर्त्यांचे अन् हितचिंतकांचे
या दुहेरी सन्मानाबद्दल आणि मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक आणि विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रवींद्र कर्वे म्हणाले, “आमचे सर्व विद्यार्थी, पालक, देणगीदार, पालक कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो आहोत. आम्ही या सर्वांप्रती अत्यंत कृतज्ञ आहोत. भविष्यात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अशीच नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी तुम्ही सर्व जण आमच्या बरोबर आहातच, हाच विश्वास या निमित्ताने दृढ होतो.”
