Thursday, August 20, 2026
Latest:
धर्म संस्कृती

सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि मनपा सेवकाच्या गैरकृत्यांची चौकशी होणार; हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेनेच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर, ३० जून २०२६:

शहरातील बापूजीनगर येथील शासकीय समाजमंदिराचा बेकायदेशीरपणे ‘चर्च’ म्हणून वापर करणे, परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि हिंदू आरक्षणाचा गैरवापर करून शासकीय नोकरी लाटणे, या कथित गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश आले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत मनपा आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त श्रीमती सोनाली यादव यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच, राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूरचे माजी मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांनीही या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती.

शासकीय वास्तूवर अतिक्रमण आणि आरक्षणाचा गैरवापर

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक दत्तात्रय कानेपागूल उर्फ येहान मार्क कानेपागूल याच्यावर हे गंभीर आरोप आहेत. महानगरपालिकेने हे समाजमंदिर केवळ सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले होते, ज्याची मुदत आता संपलेली आहे. मात्र, अटींचे उल्लंघन करून या सार्वजनिक वास्तूला बेकायदेशीरपणे ‘चर्च’चे स्वरूप देण्यात आले. तेथे ध्वनिक्षेपकाचा मोठ्या आवाजात वापर करणे, धर्मांतर करणे आणि धार्मिक भावना दुखवणारी वक्तव्ये केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

याशिवाय, संशयित आरोपी कानेपागूल याने ‘हिंदू मोची’ समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवली, मात्र सद्यस्थितीत तो ख्रिश्चन धर्म स्वीकारून ‘जिजस गॉस्पेल सोसायटी’चा मुख्य पास्टर म्हणून काम पाहत आहे. शासकीय सेवेत राहून असा दुहेरी लाभ घेणे हा शासनाची फसवणूक करणारा गंभीर गुन्हा आहे.

राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला मज्जाव

स्थानिक नागरिकांना या सार्वजनिक समाजमंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जांबमुनी महाराज यांची जयंती साजरी करण्यास मज्जाव केला जात असल्याचाही आरोप आहे. तसेच, हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रमुख मागण्या:

‘जिजस गॉस्पल सोसायटी’चा भाडेकरार रद्द करून ती वास्तू त्वरित सील करावी आणि सर्वसामान्यांसाठी खुली करावी.

‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९’ चा भंग केल्याप्रकरणी मनपा सेवक कानेपागूल याला सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करून त्याच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

“प्रशासनाने आणि विधी व न्याय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांचे आम्ही स्वागत करतो. आता प्रशासनाने पुढील १५ दिवसांत संबंधित अनधिकृत चर्चची वास्तू सील करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिला आहे.