ठळक बातम्या

नवी मुंबई विमानतळ नामकरण: कल्याण-डोंबिवलीतून भाजप नगरसेविका डॉ. सुनिताताई पाटील यांचा प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा

पनवेल:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता अधिक व्यापक आणि तीव्र होत चालले आहे. या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या रश्मिता पोपेटा यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. आज आंदोलनस्थळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांची रिघ लागली होती. खासदार श्रीरंग बारणे यांच्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका डॉ. सुनिताताई पाटील यांनी स्वतः आंदोलन स्थळावर जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला.

वारी स्वच्छ, पर्यावरण सुरक्षित! ‘निसर्गवारी’ अभियानाची विठूरायाच्या चरणी १५ वर्षांची अखंड सेवा; कचरामुक्त वारीचा संकल्प

“लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळालच पाहिजे” – डॉ. सुनिताताई पाटील

नवी मुंबई येथे सुरू असलेल्या या आमरण उपोषणाला उपस्थित राहून नगरसेविका डॉ. सुनिताताई पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या सुरात सूर मिसळला. “लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालच पाहिजे, ही संपूर्ण भूमिपुत्रांची आणि जनतेची भावना आहे,” अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. कल्याण-डोंबिवली भागातून लोकप्रतिनिधींनी थेट आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिल्याने या आंदोलनाला आता मुंबई आणि ठाणे परिसराबाहेरूनही मोठी ताकद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन रश्मिता पोपेटा यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत नामकरणाबाबत सरकारकडून ठोस आणि लेखी निर्णय येत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार पोपेटा यांनी व्यक्त केला आहे.

सरकारी योजनेला सेवेचा अर्थ! मानसिक अस्वस्थतेवर मात करत विकास देशमुख यांनी घडवले सामाजिक परिवर्तन

उलवे रस्ता रोकोप्रकरणी चार आंदोलनकांवर गुन्हा दाखल

दुसरीकडे, रविवारी दुपारी पाऊणेचार वाजेच्या सुमारास उलवे ते बेलापूर महामार्गावर तरघर पुलाजवळ आंदोलनकर्त्यांनी विनापरवाना रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात चार प्रमुख आंदोलनकांवर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनोज मेहेर, विशाल दुर्डेकर, संदीप मेहेर आणि विनोद कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनकांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्याच्या मध्यभागी बसून घोषणाबाजी केली, तसेच वाहतूक रोखून धरत वाहनांना अडथळा निर्माण केला. या पोलीस कारवाईमुळे प्रकल्पग्रस्तांमधील संताप आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा; सरकारच्या भूमिकेवर नाराजी

रश्मिता पोपेटा यांच्या या उपोषणाला भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या प्रमुख पक्षांसह आता भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिल्याने आंदोलन सर्वपक्षीय बनले आहे. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही यात सहभागी झाले आहेत. मात्र, सहा दिवस उलटूनही राज्य सरकारचा कोणताही मंत्री किंवा अधिकृत प्रतिनिधी चर्चेसाठी न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माजी विद्यार्थी ते मुख्य अतिथी… विनोद तावडेंचा साठ्ये कॉलेजमधील ‘तो’ अभिमानाचा क्षण!

अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या हाती

खासदार श्रीरंग बारणे यांनी आंदोलकांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी स्वतः लोकसभेत दोन वेळा या नामकरणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकारने यापूर्वीच नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून गृहविभागाचा आवश्यक अहवालही सादर केला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा अंतिम निर्णय आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेतला जाणार असून, सरकारकडून याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच दि. बा. पाटील यांच्या नावाव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय विचारार्थ नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.