सामाजिक

वारकरी संप्रदायाला ‘घुसखोर’ ठरवणारे विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा; हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आक्रमक मागणी

अकोला:

वारकरी संप्रदायातील २० जणांची ‘घुसखोर’ म्हणून सूची प्रसारित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्याविरोधात आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. लवांडे यांनी वारकरी संप्रदायाचा अपमान केला असून, शासनाने त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.

वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण

या संदर्भात बोलताना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, “गेल्या ८०० वर्षांपासून संतांचा वारसा लाभलेल्या वारीत अमूक लोक घुसखोर आहेत, हे ठरवण्याचा अधिकार लवांडे यांना कुणी दिला? ही त्यांच्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी आहे. वारकरी संप्रदायावर केलेले आरोप हे थेट हिंदुत्वावर आणि धर्मावर केलेले आघात आहेत. समाजात दुही माजवण्याचे हे षड्यंत्र आम्ही खपवून घेणार नाही.”

 

खरे घुसखोर ‘अर्बन नक्षलवादी’ आणि ‘पुरोगामी

पत्रकार परिषदेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ आणि ‘तथाकथित पुरोगामी’ यांच्यावरही कडक टीका करण्यात आली. वारीमध्ये नियोजनबद्ध रितीने घुसखोरी करून वारीला ‘सेक्युलर’ बनवण्याचा प्रयत्न हे गट करत असल्याचा आरोप करण्यात आला. अभंगांचे चुकीचे अर्थ लावून भाविकांची दिशाभूल करणाऱ्या या खऱ्या घुसखोरांवर राष्ट्रवादीचे नेते मौन का पाळतात, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

अटकेची मागणी आणि इशारा

“वारी ही धर्मनिरपेक्ष नसून एक महान धार्मिक परंपरा आहे. या परंपरेवर होणारे आघात हाणून पाडण्यासाठी प्रत्येक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटित झाला आहे,” असे आवाहन श्री. घनवट यांनी केले. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेला श्रीकांत पिसोळकर (विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, उदय महा (संयोजक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती) राजूभाऊ मंजुळेकर (जिल्हाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद) ह.भ.प. उमेश महाराज (वारकरी संप्रदाय) श्रीराम पांडे (अध्यक्ष, हिंदू महासभा) अरविंद देठे (अध्यक्ष, पुरातन महादेव मंदिर) उपस्थित होते.