Wednesday, July 1, 2026
Latest:
शैक्षणिक

एसएनडीटी विद्यापीठाने विद्यार्थिनींमध्ये उद्यमशीलता रुजवावी- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. ८
आपल्या १०७ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीमध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून राज्याच्या विकासामध्ये योगदान दिले आहे. विद्यापीठाने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी विद्यार्थिनींमध्ये उद्यमशीलता रुजवावी असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी काल येथे केले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा १०८ वा स्थापना दिवस समारंभ शुक्रवारी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

आज महिला स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी सेवा, व्यापार प्रबंधन यांसह अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देत असल्या तरीही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अधिक अनुकुल वातावरण तयार करणे आवश्यक आहे, असेही राज्यपाल बैस म्हणाले.

उद्यमशीलतेला वित्त पुरवठा करणाऱ्या शासनाच्या मुद्रा, अन्नपूर्णा, स्त्री शक्ती यांसारख्या अनेक योजना कार्यरत असून त्याबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यासाठी संस्थागत व्यवस्था निर्माण करावी अशी सूचनाही राज्यपालांनी विद्यापीठाला केली.

उच्च शिक्षण देत असल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, याबद्दल प्रस्ताव सादर केला असून लवकरच विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळणे अपेक्षित असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देताना विशेष दर्जा देखील द्यावा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठाच्या २०२२- २०२७ या कालावधीसाठी तयार केलेल्या विस्तार योजनेची माहिती दिली. राज्यपालांच्या हस्ते आदर्श शिक्षक, उत्कृष्ट महाविद्यालय तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. मणिबेन नानावटी महाविद्यालयाच्या रिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून तर गावदेवी येथील बी एम रुईया महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सन्मानित करण्यात आले.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *