मणिपूर सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा – नसीम खान
मुंबई, दि. ३० जून
मणिपूरमध्ये दोन महिन्यापासून हिंसाचार सुरु असून देशाचे पंतप्रधान या गंभीर समस्येवर गप्प बसून आहेत हे चिंताजनक आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेटी दिली तरीही तेथे शांतता आणि सामाजिक सौहार्दाला चालना मिळाली नाही.
मणिपूरमधील हिंसाचार आणि द्वेष तात्काळ थांबवण्यासाठी राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक गट, ख्रिश्चन संघटना आणि आदिवासी नेते यांनी राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन मणिपूर प्रश्नावर राष्ट्रपतीसाठीचे निवेदन सादर केले. या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये अनेक दशकांपासून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र रहातात. पण दोन महिन्यातील हिंसाचारात २०० हून अधिक प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त झाली असून १२ हजारांपेक्षा लोक विस्थापित झाले आहेत. केंद्र सरकारकडे अनेक विनवण्या करूनही त्यांनी कोणतीच मदत पुरवली नाही म्हणून तात्काळ राष्ट्रपती राजवाट लागू करणे गरजेचे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
—–
