ठळक बातम्या

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात मुसळधार पाऊस – सखलभागात पाणी साचले, रस्ते वाहतूक मंदावली

सखलभागात पाणी साचले, रस्ते वाहतूक मंदावली

मुंबई, दि. २८
मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचले तर रस्ते वाहतूक मंदावली.

बुधवारी सकाळपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. अंधेरी, घाटकोपर, साकीनाका येथील रस्त्यांवर वाहन चालविणे अवघड झाले.

मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला. सकाळपासून लोकल विलंबाने धावत होत्या. बुधवारी पहाटेच्या सुमारास मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईत कालपासून २६ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या आणि १५ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळाल्या. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांच्या कामामुळे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली.

कल्याण डोंबिवली परिसरातही पावसाचा जोर होता. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर जलमय झाला. काही परिसरात अनेक नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *