काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळेच भारतभरात ‘काश्मीर पॅटर्न’ – राहुल कौल
फोंडा, दि. १९
काश्मिरी पंडितांचा नरसंहार कोणतेही सरकार मान्य करायला तयार नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जिथे जिथे मुसलमानबहुल भाग आहे, तिथे तिथे ‘काश्मीर पॅटर्न’ राबविला जात आहे. त्यामुळे आज भारतात अनेक ठिकाणांवरून हिंदू पलायन करत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष राहुल कौल यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त कौल ‘काश्मिरी पंडितांचा नरसंहार नाकारल्याने देशावर होणारा परिणाम !’ या विषयावर बोलत होते.
कर्नाटक राज्यातील चित्रपट निर्माते प्रशांत संबरगी, ‘संयुक्त भारतीय धर्मसंसदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर आणि ‘राष्ट्र धर्म संघटने’चे अध्यक्ष संतोष केंचम्बा यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
जोपर्यंत काश्मिरमधील हिंदूंवरील अत्याचारांना नरसंहार मानले जात नाही, तोपर्यंत काश्मीर हिंदूंचे पूनर्वसन शक्य नाही. हा केवळ काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचा विषय नाही, तर देशातील साठहूंन अधिक ठिकाणी ‘काश्मिरी पॅटर्न’ वापरून इस्लामिक जिहादी डोके वर काढत आहेत, असे कौल म्हणाले.
सद्यस्थितीत काश्मीरमधील ९९ टक्के मुसलमान जिहादी विचारांचे आहेत. काश्मिरी पंडितांवर आक्रमण हे भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठीचे षड्यंत्र आहे. मागील एक हजार वर्षे काश्मिरी पंडितांवर इस्लामी आक्रमणे होत आहेत.
१९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी केलेले पलायन हे काश्मीरच्या इतिहासातील सातवे पलायन होते; मात्र प्रत्येक वेळी ते तेवढ्याच निर्धाराने काश्मीरमध्ये परतले होते. आज ३७० कलम हटविण्यात येऊनही अद्यापही काश्मिर हिंदूंसाठी सुरक्षित नाही, ही वस्तुस्थिती आहे.
काश्मिरी पंडितांचा नरसंहार मान्य केला नाही, तर त्याचे प्रतिबिंब संपूर्ण भारतात दिसेल, असा इशाराही कौल यांनी या दिला.
—–
