Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

मध्य रेल्वेच्या तिकिट तपासनीसांना आता कॅमे-याचे ‘अंगकवच’!- २४ स्थानकांवर आलटून पालटून वापर करण्यात येणार

मुंबई, दि. १६
मध्य रेल्वेच्या तिकिट तपासनीसांना (टीसी) बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला असून सध्या तरी असे ५० कॅमेरे तिकिट तपासनीसांना दिले जाणार आहेत. मध्य रेल्वेवरील २४ स्थानकांवरील टीसींना हे कॅमेरे आलटून-पालटून दिले जाणार आहेत.
तिकिट तपासनीस आणि विनातिकीट प्रवासी यांच्यात अनेकदा वाद होतात. विनातिकीट प्रवाशांकडून तिकिट तपासनीसांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत.‌ त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने तिकिट तपासनीसांना हे कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे पुढील आठवड्यापासून मुंबई विभागातील २४ स्थानकांवरील तिकीट तपासनीसांना (टीसी) बॉडी कॅमेरे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांचा यात समावेश आहे.
तिकिट तपासनीसांच्या शर्ट/कोटावर हे कॅमेरे लावण्यात येणार असून या कॅमेरामध्ये ध्वनीचित्रमुद्रण केले जाणार आहे. हे ध्वनीचित्रमुद्रण ३० दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवता येणार आहे.
या कॅमेऱ्यांमुळे प्रवाशांचे तिकिट तपासनीसांबरोबरचे गैरवर्तन थांबेल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *