धर्म संस्कृती

शनिशिंगणापूर देवस्थानातील बांधून ठेवलेली महाघंटा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मागणीनंतर भाविकांसाठी खुली

मुंबई, दि. ४

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर मंदिराच्या मुख्यद्वारात असलेली महाघंटा देवस्थानच्या कार्यालयास अडथळा येतो, म्हणून मागील तीन ते चार वर्षांपासून बांधून ठेवण्यात आली होती. श्री शनी मंदिरातील महाघंटा वाजवण्याची परंपरा पुन्हा चालू करावी, या मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने श्री शनैश्चर देवस्थानाला देण्यात आले होते. याची दखल घेऊन महाघंटा भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानातील बांधून ठेवलेली महाघंटा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मागणीनंतर भाविकांसाठी खुली

घंटा वाजविणे हा मंदिरातील एक महत्त्वाचा धार्मिक उपचार आहे. घंटा वाजवल्यानंतर देवतातत्त्व जागृत होते, तसेच वातावरणात सात्त्विकता प्रक्षेपित असे धर्मशास्त्र आहे. असे असतांना केवळ कार्यालयात अडथळा येतो म्हणून ती बंद ठेवणे सर्वथा अयोग्य आहे. म्हणून हिंदूंच्या संवैधानिक धार्मिक अधिकारांचा विचार करून देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर विश्वास (मामा) गडाख यांना निवेदन देण्यात आले होते.

महासंघाच्या आवाहनानंतर देवस्थानने तत्परतेने कृती केल्याविषयी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी देवस्थानचे आभार मानले आहेत.

यापूर्वीही हिंदूंचे भाग्यनगर (हैद्राबाद) येथील प्रसिद्ध आराध्यस्थान असलेले श्री भाग्यलक्ष्मीदेवी मंदिराची घंटा धर्मांधांना त्रास होतो म्हणून अशाच पद्धतीने बंद करण्यात आली होती. या संदर्भात भाग्यनगर येथील देवीभक्तांनी उच्च न्यायालयात लढा दिला होता.

यात न्यायालयाने मंदिरात घंटावादन हे भक्तांच्या प्रथा परंपरेचा मुख्य भाग असून भारतीय संविधानाच्या कलम २५ अंतर्गत मूलभूत हक्क आहे, असे म्हटले होते. मंदिरांतील प्रथा-परंपरा, धार्मिक आचार यांवर बंधने आणली जात असतील, तर मंदिर महासंघ त्यासाठी लढा देत राहिल, असे घनवट यांनी सांगितले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *