गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी २१ जूनपूर्वी ‘eShram’ वर नोंदणी करावी; भारतीय मजदूर संघाचे आवाहन
राज्यातील Swiggy, Zomato, Uber, Ola, Rapido, Blinkit, Zepto यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व गिग व प्लॅटफॉर्म कामगारांनी केंद्र सरकारच्या eShram पोर्टलवर २१ जून २०२६ पूर्वी तात्काळ नोंदणी करावी,
असे आवाहन भारतीय मजदूर संघ (BMS) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या सर्व कामगारांसाठी eShram पोर्टलवर नोंदणी करणे सीअनिवार्य केले असून, त्यासाठी २१ जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
सामाजिक सुरक्षेचे कवच मिळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत लाखो युवक डिलिव्हरी पार्टनर, कॅब चालक, बाईक टॅक्सी चालक आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सेवा देणारे स्वतंत्र कामगार म्हणून अहोरात्र काम करत आहेत. मात्र, यातील बहुतांश कामगार अजूनही कोणत्याही सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेबाहेर आहेत. या नोंदणीमुळे कामगारांचा एक अधिकृत डेटाबेस तयार होणार असून, त्याद्वारे भविष्यात मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजना, अपघाती विमा संरक्षण, शासकीय कल्याणकारी योजना आणि कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक धोरणे आखणे सरकारला सोपे होणार आहे.
“ही नोंदणी केवळ एक औपचारिकता नसून, गिग व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक भविष्यासाठी उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र कामगाराने मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.”
— श्री. किरण मिलगीर, प्रदेश महामंत्री, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश
व्यापक जनजागृतीचे आवाहन
भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. सचिन मेंगाळे यांनी राज्यातील सर्व कामगार संघटना, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील प्रत्येक डिलिव्हरी बॉय आणि चालकापर्यंत ही माहिती पोहोचवून जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक कामगाराला सामाजिक सुरक्षेच्या कवचाखाली आणण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
भारतीय मजदूर संघाने “संघटित व्हा – नोंदणी करा – हक्क मिळवा!” असा नारा देत सर्व डिलिव्हरी पार्टनर्स, कॅब चालक आणि बाईक टॅक्सी चालकांना वेळ न घालवता eShram पोर्टलवर नोंदणी करून आपले हक्क व भविष्य सुरक्षित करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क:
श्रीपाद कुटासकर: 9422207010
सागर पवार: 9890169667
प्रणामीका बनसोडे: 9082696926

