श्रमाचा गौरव हाच राष्ट्राचा गौरव’; पुरी येथे भारतीय मजदूर संघाचे २१ वे अखिल भारतीय अधिवेशन
पुणे/मुंबई:
भारताच्या विकासात श्रमिकांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि कामगार चळवळीला नवी दिशा देण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे (BMS) २१ वे अखिल भारतीय अधिवेशन ओडिशातील पवित्र नगरी पुरी येथे आयोजित करण्यात आले आहे. ६, ७ व ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या या अधिवेशनाचे ब्रीदवाक्य “श्रमाचा गौरव हाच राष्ट्राचा गौरव” असे असून, यात देशभरातील श्रमिक प्रश्नांवर मंथन होणार आहे.
विडी कामगार संघाच्या प्रयत्नातून विडी कामगारांना भविष्य निर्वाह निधी प्राप्त
भव्य उद्घाटन आणि आंतरराष्ट्रीय सहभाग
या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय श्रम व क्रीडा मंत्री मा. डॉ. मनसुख मंडाविया यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अध्यक्ष मा. श्री. हिरण्मय पंड्या असतील. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) नवी दिल्ली संचालिका सुश्री मिचिको मियामोटो यांची प्रमुख उपस्थिती या अधिवेशनाचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणारी ठरेल.
बदलत्या जागतिक परिस्थितीत श्रमिकांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सिम्पोजियम’चे उद्घाटन ओडिशाचे मुख्यमंत्री मा. श्री. मोहन चरण माझी यांच्या हस्ते होईल. या परिषदेत तब्बल १५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
१७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंतीला राष्ट्रीय श्रमिक दिन घोषित करण्याची मागणी
महाराष्ट्राचे प्रभावी प्रतिनिधित्व
या ऐतिहासिक अधिवेशनासाठी महाराष्ट्र प्रदेशातून सुमारे २०० प्रतिनिधी पुरी येथे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे आणि प्रदेश महामंत्री किरण मिलगीर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील कामगारांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडणार आहे. यामध्ये वीज, रेल्वे, बँकिंग, संरक्षण, अंगणवाडी, आशा वर्कर्स, कंत्राटी कामगार आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स अशा विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
अधिवेशनातील प्रमुख ठराव आणि मागण्या
अधिवेशनात श्रमिकांच्या हितासाठी काही महत्त्वाचे ठराव मांडले जाणार आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने:
* कंत्राटदारविरहित रोजगार व्यवस्था: कंत्राटी कामगारांच्या शोषणाला आळा घालणे.
* जीवनमान वेतन (Living Wage): केवळ किमान वेतन नव्हे, तर सन्मानाने जगता येईल असे वेतन लागू करणे.
* समान काम, समान वेतन: कामाच्या स्वरूपावरून वेतनात भेदभाव न करणे.
* तंत्रज्ञान आणि कामगार: AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) मुळे होणाऱ्या बदलांमध्ये कामगारांच्या नोकऱ्यांचे संरक्षण करणे.
* सामाजिक सुरक्षा: ईएसआय आणि भविष्य निर्वाह निधीचे काटेकोर पालन.
भारतीय मज़दूर संघाने जागतिक श्रमिक चळवळीला दिशा द्यावी” – डॉ. मोहनजी भागवत
७ फेब्रुवारीला भव्य ‘श्रमिक रॅली’
अधिवेशनाचा विशेष भाग म्हणून ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुरी येथे भव्य श्रमिक रॅली आणि सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
“हे अधिवेशन राष्ट्रनिर्मितीत श्रमिकांची भूमिका अधिक सशक्त करणारे ठरेल. महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस भूमिका या व्यासपीठावर मांडली जाईल,” अशी माहिती सचिन मेंगाळे (उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश तथा सरचिटणीस, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ) यांनी दिली आहे.
