राजकीय

कल्याण-डोंबिवली पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे ‘राष्ट्रासाठी’ मतदानाचे आवाहन

डोंबिवली:
“कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भवितव्य आणि शहराचा पारदर्शक विकास केवळ भाजपच करू शकते. केरळसारख्या डाव्या बालेकिल्ल्यात जर भाजपचा महापौर बसू शकतो, तर इथेही विचारसरणीला स्मरून विकासासाठी आणि राष्ट्रासाठी भाजपलाच मतदान करा,” असे रोखठोक आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात आयोजित ‘भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात’ ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने या मेळाव्याद्वारे मोठे शक्तीप्रदर्शन केले असून, यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सनबर्न’मधील नशेखोरीकडे दुर्लक्ष करणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ शोधा!
कार्यकर्त्यांना संबोधित करताना चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. २०१४ पासून झालेला विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून मिळणारा निधी यामुळे शहरांचे रूप पालटत असल्याचे त्यांनी सांगितले. “केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने कामांना गती मिळाली आहे, हाच वेग कायम ठेवण्यासाठी महापालिकेतही भाजपचाच महापौर बसवणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही ‘भाजपचा महापौर’ हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगून निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

महाराष्ट्रातून लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल: ‘सरकार ठोस कारवाई का करत नाही?’
स्थानिक प्रश्नांना बगल, राष्ट्रीय मुद्द्यांचाच बोलबाला

निवडणूक महापालिकेची असूनही चव्हाण यांच्या भाषणात स्थानिक नागरी समस्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांचाच प्रभाव अधिक जाणवला. त्यांनी मुंबईला जाणारे चाकरमानी आणि वाहतूक कोंडीचा केवळ ओझरता उल्लेख केला. मात्र, डोंबिवलीकरांना भेडसावणारे गंभीर प्रश्न जसे की—अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचा विळखा, मुजोर रिक्षाचालक, अरुंद रस्ते आणि पाणी टंचाई—यावर त्यांनी मौन पाळल्याने उपस्थित नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.

८८ डेसीबलचा दणदणाट आणि नियमांचे उल्लंघन

मेळाव्याच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ढोल-ताशा पथके आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाची पातळी तब्बल ८८ डेसीबलपर्यंत नोंदवण्यात आली. निवासी क्षेत्रात दिवसा आवाजाची मर्यादा ४५ डेसीबल असताना, या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. भाषणांच्या वेळी आवाज आवाक्यात असला, तरी सुरुवातीच्या गोंधळाने ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एकूणच, आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन पक्षाची विचारसरणी पोहोचवण्याचे आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.