“हिंदायान” स्पर्धा आणि मोहीम सर्वांसाठी खुली नोंदणी करण्याचे आवाहन
ठाणे दि.१७ :- “हिंदायान” सायकल स्पर्धेचे पहिले पर्व दि. 5 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत नवी दिल्ली ते पुणे यादरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाले होते. “हिंदायान” च्या दुसऱ्या पर्वात विविध मोहिमा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पर्वात ही स्पर्धा व मोहीम सर्वांसाठी खुली आहे. ही मोहीम दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथून सुरू होईल आणि आग्रा, जयपूर, गांधीनगर, ठाणे आणि मुंबई मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी म्हणजेच दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी सिंहगड, पुणे येथे या स्पर्धेची सांगता होणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात दि.1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत प्रत्येकी 110 किमीच्या तीन टप्प्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
“हिंदायान” ही स्पधा्र व मोहीम सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत व मोहिमेत सहभागी होण्यासाठी राईडची नोंदणी अधिकृतपणे सुरू झाली आहे. तरी इच्छुक सायकलपटूंनी नोंदणी करण्यासाठी www.hindayan.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन “हिंदायान” चे संयोजक आणि जग परिक्रमा करणारे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव भारतीय श्री.विष्णुदास चापके केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान वर्षा येथे “हिंदायान” सायकल स्पर्धा आणि मोहीम 2024 च्या दुसऱ्या पर्वाच्या नोंदणीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला होता.
“हिंदायान” मोहीम सुरू करण्यामागे तीन उद्दिष्टे आहेत. पहिले उद्दिष्ट ऑलिम्पिकमध्ये 22 सायकलिंग इव्हेंट आहेत, ज्यात 66 पदके आहेत. तथापि, गेल्या 60 वर्षात एकही भारतीय सायकलपटू भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरलेला नाही. 1964 ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा होती, ज्यामध्ये चार सायकलपटूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या निमित्ताने भारतीय सायकलपटूस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकेल. दुसरे उद्दिष्ट आहे ते सशस्त्र दल आणि राज्य पोलिसांचे साहसी सायकलपटू सायकल शर्यतींमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जातात, कारण त्यांना अशा स्पर्धांसाठी भारतात कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही. या निमित्ताने त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल. आणि तिसरे उद्दिष्ट भारतात सायकलिंग संस्कृती विकसित करण्याची आणि त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची नितांत गरज आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास आणि शाश्वत विकासासाठी मदत होईल.
गेल्या वर्षी या मोहिमेत फक्त भारतीय भूदल आणि नौदलाचे संघ सहभागी झाले होते. मात्र यावर्षी या स्पर्धेत गृह मंत्रालय, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने सामील होण्यास प्रतिसाद दिला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानेही (NDRF) या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांचा होकार कळविला आहे. सायकल चालविणे आपल्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठीही निश्चित उपयुक्त आहे. सध्याच्या परिस्थितीत पर्यावरण रक्षणासाठी शक्य तिथे सायकलचा वापर करणे, ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे इच्छुक सायकलपटूंनी या स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी www.hindayan.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन “हिंदायान” चे संयोजक श्री.विष्णुदास चापके यांनी केले आहे.