देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ४
विकासाच्या मुद्द्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालो आहे. देशपातळीवर विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
आज सगळे विरोधक विस्कळीत आहेत. देश मोदींच्या नेतृत्वाखाली आगेकूच करतो आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे या भावनेतून सरकारमध्ये आलो, असेही पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि मी अडीच वर्षे सत्तेत होतोच. शिवाय भाजपमधील काही मंत्र्यांबरोबर आम्ही काम केले आहे. त्यामुळे पहिल्या कॅबिनेटबाबत आम्हाला काही विशेष वाटले नाही. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आम्ही चर्चा केली, असेही पवार यांनी सांगितले.
आम्ही एकत्र काम करायचे ठरविले आहे. त्यामुळे कुठलीही नाराजी नाही, कुणाला कसली अडचण नाही. जेव्हा एका पक्षात विस्तार होतो किंवा पदांचे वाटप होते तेव्हा मतमतांतरे असू शकतात. मात्र सगळ्यांचे म्हणणे ऐकल्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि ते योग्य पद्धतीनेच घेतील असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
——–
