राज्यात कौशल्य क्रांती आणण्यासाठी कौशल्य विद्यापीठाची भूमिका महत्वाची- राज्यपाल बैस
पनवेल दि.२६ :- महाराष्ट्रात कौशल्य क्रांती आणण्यासाठी कौशल्य विद्यापीठ महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयटीआय पनवेलच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते सोमवारी पनवेल येथील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा व रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील आदिवासी बांधवांकडे अनेक कला, क्रीडा व उद्योग कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन बांबू फर्निचर आदी वस्तूंच्या विपणन, पॅकेजिंग व विक्रीसाठी मदत केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. कौशल्य विद्यापीठाने महिलांसाठी तसेच शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी यांच्यासाठीही कौशल्यवर्धन कार्यक्रम तयार करावे अशी सूचनाही राज्यपाल बैस यांनी केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील सेवा क्षेत्र सातत्याने वाढत असून या क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण होत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी मनुष्यबळ तयार करावे लागेल. राज्यात १५ हजार स्टार्टअप्स असून लवकरच नवी मुंबई येथे स्टार्टअप हब तयार करण्यात येईल. कौशल्य विद्यापीठ व आयटीआय पनवेलची नवी वास्तू येत्या जुलैमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी तयार होईल असे आश्वासन लोढा यांनी दिले.
तर कौशल्य विद्यापीठाचे पहिले उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु करावे आणि त्याठिकाणी पर्यटन विषयक अभ्यासक्रम राबवावेत अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ रामास्वामी एन., कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे हे मान्यवर उपस्थित होते.
