ठळक बातम्या

रायगड किल्ल्यावर उद्या शिवराज्याभिषेकदिन सोहळा

मुंबई, दि. १
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य शासनातर्फे उद्या ( शुक्रवार, २ जून) रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती या वेळी उपस्थित राहणार आहेत. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने आजपासून ६ जूनपर्यंत रायगड किल्ला परिसरात पाचाड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग आणि वाकण-खोपोली मार्गावरील अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासून २ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत, तर ४ जूनला रात्री १२ पासून ते ६ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान सांस्कृतिक कार्य विभाग आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ७ जूनपर्यंत गेटवे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *