श्री स्वामी समर्थांच्या पवित्र रक्तचंदन पादुकांचे २५ व २६ ऑगस्ट रोजी अर्नाळ्यात आगमन; दर्शनासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
विरार (पालघर): अक्कलकोटस्थित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक रक्तचंदन पादुकांचे २५ ऑगस्ट रोजी रात्री अर्नाळा (विरार पश्चिम) येथील ‘श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान’ मठात पावन आगमन होणार आहे. भाविकांना २६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.
नूतन गुळगुळे फाउंडेशनतर्फे संचालित ‘स्वानंद सेवा सदन’ येथे दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य केले जाते. याच वास्तूतील “गजलक्ष्मी स्वरूप, कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान मठ” हे श्रद्धा व मानवसेवेचा एक केंद्रबिंदू ठरत आहे. स्वामी समर्थांनी त्यांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्यांना या रक्तचंदन पादुका प्रदान केल्या होत्या. चोळप्पा महाराजांच्या पाचव्या वंशातील श्री अण्णू महाराज यांच्या माध्यमातून या पादुका अर्नाळा येथे आणल्या जात आहेत.
भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन:
२५ ऑगस्ट: रात्री ९ वाजता ह. भ. प. मधुरा प्रभू अनारेडी यांचे कीर्तन होईल, त्यानंतर रात्री १० वाजता पादुकांचे आगमन होईल.
२६ ऑगस्ट: सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अभिषेक, पूजा आणि दर्शन सोहळा पार पडेल. सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. श्री राजेंद्र बुवा तावडे व श्री प्रशांत सोनावणे यांचे भक्तिरसपूर्ण कीर्तन रंगेल.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे घाण्याच्या बैलाचे व पंढरपूरच्या विठू माऊलींचे भव्य चलचित्र, कासवाची भव्य फुलांची रांगोळी, महाआरती आणि महाप्रसादाचा भंडारा.
मुंबई, पालघर, ठाणे, नवी मुंबई व रायगड परिसरातील सर्व स्वामीभक्तांनी या सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठ संस्थापिका सौ. नूतन गुळगुळे व श्री विनायक गुळगुळे यांनी केले आहे.

कार्यक्रम तपशील:
स्थळ: श्री स्वामी समर्थ शक्ती स्थान (मठ), फॅक्टरी पाडा, अर्नाळा, वसई-विरार (पश्चिम), जि. पालघर.
संपर्क (अधिक माहितीसाठी): सौ. मेघा घोडे ( ८१४९४७४९९१ ), सौ. नूतन गुळगुळे ( ९९२०३८३४४६ / ९८१९१४१९०६)

