Thursday, August 20, 2026
Latest:
सामाजिक

जर्मनीतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय समर स्कूलसाठी डोंबिवलीकर आलोक तिवारी यांची निवड; भारताचे करणार प्रतिनिधित्व!

डोंबिवली:

​डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला गौरवान्वित करणारे आलोक वीरेंद्र तिवारी यांची जर्मनीतील पासौ आणि म्युनिक येथे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय समर स्कूलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. सध्या हरियाणा येथील प्रसिद्ध ऋषिहुड युनिव्हर्सिटीमध्ये ‘प्रोग्राम मॅनेजर – इन्स्ट्रक्शनल डिलिव्हरी’ म्हणून कार्यरत असणाऱ्या आलोक यांच्या या यशाने डोंबिवली आणि महाराष्ट्राच्या मानात तुरा रोवला गेला आहे.

​३ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित या १३ दिवसीय प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन युनिव्हर्सिटी ऑफ पासौ आणि हान्स सीडेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी जगभरातील १४ देशांतून केवळ २५ उत्कृष्ट प्रतिनिधींची निवड करण्यात आली असून त्यात भारताकडून आलोक तिवारी यांचा समावेश आहे.

​”विकेंद्रीकरण, सुशासन आणि भू-राजकीय बदल” (Decentralization, Good Governance and Geopolitical Shifts) हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे. जागतिक सत्ता समीकरणांमधील बदल, विकेंद्रीकरण धोरणे, राज्याची क्षमता आणि स्थानिक शासन मॉडेल्सवर होणारे परिणाम यांचे सखोल विश्लेषण या उपक्रमात केले जाणार आहे.

​यामध्ये तुलनात्मक संघराज्य पद्धत (Comparative Federalism), उप-राष्ट्रीय मुत्सदीगिरी (Subnational Diplomacy), अल्पसंख्याक हक्कांचे संरक्षण आणि उदयोन्मुख भू-राजकीय वास्तवातील राज्याची लवचिकता यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण विषयांवर मंथन होणार आहे. तसेच बाव्हेरियन संसदेतील प्रत्यक्ष संवाद आणि धोरण सिम्युलेशन सरावाचाही या उपक्रमात समावेश आहे.

सौ. धनश्री सुबोध पटवर्धन: कला, कर्तृत्व, साहस आणि सौंदर्याचा अनुपम आविष्कार

​अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून नेतृत्व आणि अभ्यासाचा पाया:

​आलोक तिवारी हे मूळचे डोंबिवलीचे निवासी असून विद्यार्थी दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थी हित, शैक्षणिक मुद्दे आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय भूमिका बजावली आहे. या अनुभवातूनच त्यांच्यात नेतृत्वगुण आणि सार्वजनिक धोरणांविषयीची जाण विकसित झाली आहे.

​त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर (Masters) पदवी प्राप्त केली असून त्यांच्याकडे सार्वजनिक धोरण (Public Policy) या विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील आहे.

​आपल्या या निवडीबद्दल भावना व्यक्त करताना आलोक तिवारी म्हणाले, “या जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. शासनप्रणाली आणि उप-राष्ट्रीय मुत्सदीगिरीवर भारतीय दृष्टिकोन मांडण्यासोबतच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासाचा अनुभव घेण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.”

​डोंबिवलीच्या या प्रतिभावान तरुणाच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राजधानीत मराठी चित्रपटांचा नवा अध्याय: खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवा’चे भव्य उद्घाटन