Wednesday, June 10, 2026
Latest:
सामाजिक

नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा दुर्मिळ संगम’ : पराग वेदक यांच्या श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून भावना व्यक्त

मुंबई:

नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणांचा एकत्रित संगम असलेली माणसे फार दुर्मिळ असतात. दिवंगत पराग शरदकुमार वेदक हे अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी एक होते. ते खऱ्या अर्थाने ‘जगनमित्र’ आणि ‘राजा माणूस’ होते,” अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने पराग वेदक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

​६ जून २०२६ रोजी आर्यन हायस्कूलच्या सभागृहात पराग शरदकुमार वेदक यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सर्व स्तरांतील संस्थांमधील लोकांचा आणि नागरिकांचा मोठा समुदाय उपस्थित होता.

​प्रखर हिंदुत्व आणि अभाविपमधील योगदान

श्रद्धांजली सभेत पराग वेदक यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते सामाजिक क्षेत्रातील कारकिर्दीचा वेध घेण्यात आला.

​अभाविप आणि काश्मीर आंदोलन: राज्याचे कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) काळातील पराग यांच्या आठवणींना उजाळा दिला. काश्मीर आंदोलन आणि मोर्च्यांच्या काळातील पराग यांचा संघर्ष त्यांनी मांडला.

दंगलीतील कणखर भूमिका: सतीश कुलकर्णी यांनी १९९२ च्या मुंबई दंगलीतील पराग यांचे कणखर आणि प्रखर हिंदुत्वाचे रूप उपस्थितांसमोर ठेवले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीतील पराग यांच्या अजोड नियोजन आणि रणनीतीचा कोणीच हात धरू शकत नव्हता, हे अधोरेखित केले.

संघटनात्मक कार्य: श्रीधर आगरकर आणि योगेश प्रभू यांनी ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’मधील पराग यांच्यासोबतचे अनुभव सांगितले. समीर गाजरे यांनी दक्षिण मुंबईतील कामांचे अनुभव सांगत त्यांच्यातील नेतृत्व गुणांचे कौतुक केले.

तर डॉ. प्रा. जयंत कुलकर्णी यांनी पुणे महानगरात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतानाचा पराग यांचा प्रवास मांडला. वनवासी कल्याण आश्रमाचे (सिलिगुडी, पश्चिम बंगाल) पूर्णवेळ कार्यकर्ते शरद चव्हाण यांनी ऑडिओ संदेशाद्वारे, पराग यांनी कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.

​पक्षातीत मैत्री आणि कामाची तळमळ

​पराग वेदक यांच्या निधनाने राजकीय भिंती बाजूला सारून सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला.

खासदार अरविंद सावंत (उबाठा): “वैचारिक संघर्ष करणारा परंतु हिंदुत्व हा विषय मनात ठासून भरलेला एक चांगला मित्र मी गमावला आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर: “इतरांसाठी छोट्यातील छोटे कामसुद्धा अत्यंत तळमळीने करणे आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करून ते काम तडीस नेणे, हा पराग यांचा स्वभाव होता,” असे नार्वेकर म्हणाले.

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा: त्यांनी पराग यांच्यातील अफाट जिद्द आणि चिकाटीच्या प्रसंगांचे स्मरण केले.

माजी नगरसेवक शरद पेटीवाला: “महानगरपालिकेचे तिकीट मिळाल्यानंतर मला निवडून आणण्यासाठी पराग यांनी जे सूक्ष्म नियोजन आणि अफाट मेहनत घेतली, केवळ त्याचमुळे मी ती निवडणूक जिंकू शकलो,” अशी भावुक आठवण पेटीवाला यांनी सांगितली.

विविध संस्थांची श्रद्धांजली: दैवज्ञ समाज, व्यापारी संघ आणि कोळीवाडी यांच्या प्रतिनिधींनीही पराग यांच्या सहृदयतेचे आणि त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले. कौटुंबिक स्तरावर त्यांचे साडू संकेत देवरुखकर आणि वहिनी शुभांगी मनीष वेदक यांनी पराग यांच्या घरगुती आठवणींना उजाळा दिला.

​यशवंतराव केळकरांची जीवनदृष्टी १००% जगणारा कार्यकर्ता: विनोद तावडे

सभेचा समारोप करताना भाजपचे राष्ट्रीय महामंत्री आणि खासदार विनोद तावडे म्हणाले की, “अभाविपमध्ये स्वर्गीय यशवंतराव केळकर यांनी जो जीवनदृष्टीचा सिद्धांत मांडला, ती जीवनदृष्टी घेऊन १०० टक्के जगलेला कार्यकर्ता म्हणजे पराग वेदक होय. समोरची व्यक्ती जशी असेल तशी स्वीकारायची आणि संघटनेच्या कामाला आवश्यक अशी ती घडवायची, यात पराग माहिर होते. आज गिरगावात ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’चा झालेला विस्तार हे त्याचेच जिवंत उदाहरण आहे. प्रत्येकाने पराग यांचा किमान एकतरी गुण आपल्या आयुष्यात घेण्याचा प्रयत्न करावा.

​’प्रतिपराग’ उभे करणे हीच खरी श्रद्धांजली

​पुढील वर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची रौप्य महोत्सवी (२५ वे वर्ष) नववर्ष स्वागत यात्रा होणार आहे. या स्वागत यात्रेची संकल्पना ज्यांनी तयार केली, रुजवली आणि ती सर्व स्तरात पोहोचवली, ते या संकल्पनेचे शिल्पकार पराग वेदक आज आपल्यात नसणे ही अत्यंत दुःखद आणि वेदनादायी बाब आहे, अशा भावना त्यांचे स्नेही सौरभ सुरेश मोडक यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.

​”प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पराग यांच्यातील गुण आत्मसात केले, तर पुढील वर्षीच्या रौप्य महोत्सवी स्वागत यात्रेला अनेक ‘प्रतिपराग’ उभे राहतील. पराग देहरूपाने नसले, तरी या कार्यकर्त्यांच्या रूपाने ते तिथे नक्कीच असतील,” असा विश्वास मोडक यांनी व्यक्त करत पराग वेदक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.