Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर
मुंबई, दि. १
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.
अपघाताची माहिती कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
ही दुर्घटना कळताच महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बुलढाणा बस अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
