कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ‘निर्भय बनो’ चे महेश निंबाळकर यांंचे आंदोलन
डोंबिवली, दि. १
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात ‘निर्भय बनो’ संस्थेचे महेश निंबाळकर यांनी आज (गुरुवारी) येथे आंदोलन केले.
भूमाफियांबरोबर आर्थिक व्यवहार करून महापालिका अधिकारी बेकायदा बांधकामांची पाठराखण करतात. अशा अधिकाऱ्यांना नागरिकांकडून भीक मागून मिळालेल्या पैशांचे समान वाटप करावे त्यासाठी निंबाळकर यांनी ‘भीक मागो’ आंदोलन केले.
बेकायदा बांधकामांमुळे शहराचे नियोजन बिघडले असून अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादने बेकायदा बांधकामे होत आहेत. या अनधिकृत बांधकामांबरोबरच शहरात सुरू असलेल्या काही बेकायदा धर्मस्थळांनाही महापालिका अधिकारी पाठीशी घालत आहेत,असा आरोप निंबाळकर यांनी केला.
अनधिकृत बांधकामे जोपर्यंत भुईसपाट होत नाहीत आणि या अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील, असे निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान बेकायदा बांधकाम घटनास्थळी आणि ऑनलाइन माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून निंबाळकर आंदोलन करत आहेत.
—–
