सामाजिक

बदलापूरकर सिताराम राऊळ यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! ‘वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूरकर सिताराम राऊळ यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! ‘वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित

संजय जोशी

महाराष्ट्राच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. बदलापूरचे सुपुत्र आणि प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सिताराम दिनकर राऊळ यांनी जागतिक स्तरावर भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे. लंडन येथील प्रतिष्ठित ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’तर्फे आयोजित आणि वन्यजीव छायाचित्रणातील ‘ऑस्कर’ मानल्या जाणाऱ्या ‘Wildlife Photographer of the Year 2026’ या स्पर्धेत त्यांच्या ‘Shifting Sand’ या छायाचित्राला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे.

‘Shifting Sand’ छायाचित्राची जादू

सिताराम राऊळ यांनी हे छायाचित्र राजस्थानच्या विशाल थार वाळवंटात टीपले आहे. वाळवंटातील प्रतिकूल हवामानात आणि सरकणाऱ्या वाळूच्या टेकड्यांमध्ये (Sand Dunes) एक लहान विंचू (Scorpion) स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि संरक्षणासाठी वाळूत कसा मार्ग काढतो, त्याचे अचूक क्षणचित्रे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. वाळवंटातील अद्भूत जीवसृष्टी आणि निसर्गाची कल्पकता अधोरेखित करणाऱ्या या ‘Shifting Sand’ या छायाचित्राने जगभरातील नामांकित छायाचित्रकारांच्या कलाकृतींना मागे टाकत ‘Behaviour: Invertebrates’ या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला.

सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय सन्मान

सिताराम राऊळ यांच्यासाठी हा क्षण अत्यंत विशेष आहे, कारण सलग दुसऱ्या वर्षी त्यांच्या छायाचित्रणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. गेल्या १३ वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीवांचे अद्भूत जग लोकांसमोर आणण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.

“गुरू, कुटुंब आणि बदलापूरच्या निसर्गाची साथ!”

आपल्या या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना सिताराम राऊळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आकाराने लहान असलेल्या जिवांमध्येही निसर्गाने दिलेली उत्तम कौशल्ये दडलेली असतात, हेच या छायाचित्रातून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. माझ्या या यशामागे माझे कुटुंब, आई-वडील, बदलापूर परिसरातील छायाचित्रकार मित्र आणि गुरूंचा मोठा वाटा आहे. बदलापूरच्या निसर्गाने मला नेहमीच समृद्ध केले आहे.”

सिताराम राऊळ यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्रातील निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि बदलापूरकरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.