सामाजिक

राष्ट्रनिर्मितीत कामगार शक्तीचे योगदान सर्वोपरि; केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन

भारतीय मजदूर संघाच्या २१व्या त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशनाचे पुरी येथे उत्साहात उद्घाटन

​पुरी (ओडिशा):

“भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न केवळ कामगार आणि युवकांच्या कष्ट, क्षमता व समर्पणातूनच साकार होऊ शकते. राष्ट्राच्या पुनर्निर्माण व विकास प्रक्रियेत कामगार वर्गाचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले.

​पुरी येथील स्व. ओमप्रकाश अग्रवाल सभागृहात आयोजित भारतीय मजदूर संघाच्या (BMS) २१व्या त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या भव्य अधिवेशनात देशासह जगभरातील कामगार प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे.

श्रमाचा गौरव हाच राष्ट्राचा गौरव’; पुरी येथे भारतीय मजदूर संघाचे २१ वे अखिल भारतीय अधिवेशन

​’नवे कामगार कायदे कामगार हिताचे’

​डॉ. मांडवीय यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर भाष्य करताना सांगितले की, नवीन कामगार कायद्यांमुळे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक भेदभाव नष्ट होईल. तसेच ‘समान कामासाठी समान वेतन’, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा यांची हमी या कायद्यांमुळे मिळणार आहे. भारतीय मजदूर संघाने दिलेल्या सूचनांवर सरकार गांभीर्याने विचार करत असून, कामगार कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​BMS: जगातील सर्वात मोठी संघटना

​अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. हिरण्मय पंड्या यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या प्रवासाचा आढावा घेतला. ७० वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेली BMS ही देशातील क्रमांक एकची संघटना असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही (L-20) तिचे नेतृत्व मान्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

​अधिवेशनातील ठळक मुद्दे:

  • जागतिक उपस्थिती: रशिया, ब्राझील, नेपाळ, इंडोनेशिया आणि चीन या देशांतील कामगार प्रतिनिधींची उपस्थिती.
  • महाराष्ट्राचा सहभाग: प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे व सरचिटणीस किरण मिलगीर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील १९८ पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.
  • महत्त्वाचे प्रस्ताव: कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या अधिवेशनात महत्त्वपूर्ण प्रस्ताव पारित केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली.

​मान्यवरांची उपस्थिती

​या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी. भागय्या, रशियाच्या FNRP संघटनेचे अध्यक्ष सर्गेई चेर्नोगायेव, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) मिसिको मियामोटो आणि BMS चे संयुक्त महामंत्री सुरेंद्र पांडेय उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिमते यांनी केले.

​संपूर्ण सभागृह “भारत माता की जय” आणि “देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम” अशा घोषणांनी दुमदुमून गेले होते.