भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वादाच्या भोवऱ्यात: ‘पार्टी विथ डिफरन्स’ची नैतिक घसरण की सत्तेसाठी हपापलेपण
बाळकृष्ण सामंत मौरे
भारतीय जनता पक्षाने नेहमीच स्वतःला ‘पार्टी विथ डिफरन्स’ आणि नैतिकतेचे अधिष्ठान असलेला पक्ष म्हणून मिरवले आहे. मात्र, सध्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ही प्रतिमा धुळीस मिळताना दिसत आहे. कल्याण-डोंबिवलीतील संशयास्पद ‘बिनविरोध’ विजय असो, किंवा बदलापूर प्रकरणातील आरोपींना दिलेले राजकीय संरक्षण; चव्हाण यांच्या निर्णयांमुळे भाजप बॅकफूटवर आली असून त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरच आता टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
१. ‘बिनविरोध’ विजयाचा बनाव आणि लोकशाहीची थट्टा
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे २० नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचा डांगोरा रवींद्र चव्हाण पिटत असले तरी, या विजयामागे ‘साम-दाम-दंड-भेद’चा वापर झाल्याची चर्चा जनमानसात आहे. अनेकांवर दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेल्याचे आणि पैशांचा मोठा व्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. लोकशाहीत निवडणूक लढवण्याऐवजी ती ‘मॅनेज’ करण्याच्या या प्रकारामुळे चव्हाणांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली आहे.
सत्ता आणि पैशासाठी निष्ठा खुंटीवर’; भाजपच्याच माजी नगरसेवकाचा स्वकीयांवर ‘हाऊ ओके’ प्रहार
२. दलित विरोधी चेहरा आणि मित्रपक्षांना केराची टोपली
युती धर्म पाळण्यात चव्हाण सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आणि लहुजी सेनेसारख्या मित्रपक्षांना एकही जागा न सोडता, चव्हाणांनी त्यांचा ‘दलित विरोधी’ चेहरा समोर आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. “निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पद देऊ” हे गाजर दाखवून त्यांनी मित्रपक्षांची बोळवण केली आहे. मित्रपक्षांना सत्तेत वाटा न देणे ही भाजपच्या अहंकारी राजकारणाची नांदी मानली जात आहे.
महाराष्ट्राने बिहारलाही मागे टाकले! उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलीसांसमक्ष `साम-दाम-दंडा’चा वापर
३. विलासराव देशमुखांवरील टिप्पणी: चव्हाणांना भोवली वैचारिक दिवाळखोरी
स्व. विलासराव देशमुख यांच्यासारख्या लोकनेत्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून चव्हाणांनी केवळ लातूरकरांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतला आहे. मृत व्यक्तीबद्दलचे किमान सौजन्यही न पाळल्याने त्यांना अखेर दिलगिरी व्यक्त करावी लागली. “माणसांचा भावनिक फॅक्टर दुखावला की कार्यकर्ताही पाठीशी राहत नाही,” याचे भान चव्हाण यांना राहिले नसल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले.
निवडणुकीच्या उंबरठ्यावर डोंबिवलीकरांचा ‘एल्गार’; राजकीय पक्षांना धाडलं ‘प्रश्नांचं अस्त्र’!
४. सत्तेसाठी ‘अपवित्र’ युती: अंबरनाथमध्ये काँग्रेस, तर अकोटमध्ये एमआयएम!
ज्या काँग्रेस आणि एमआयएमवर भाजप नेहमी तुटून पडते, त्याच पक्षांशी अंबरनाथ आणि अकोटमध्ये युती करून चव्हाणांनी भाजपच्या मूळ विचारधारेलाच हरताळ फासला आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपने सत्तेसाठी चक्क सुचितेला तिलांजली दिली आहे. या अनैसर्गिक युतींमुळे केंद्रीय नेतृत्वही चव्हाणांवर कमालीचे नाराज असल्याचे समजते.
५. बदलापूर प्रकरणातील आरोपीला राजाश्रय?
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, बदलापूरमधील चिमुकल्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी ट्रस्टी तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आणण्याचे पाप चव्हाणांच्या कार्यकाळात झाले. महिला संघटना आणि विरोधकांच्या दबावामुळे आपटे यांनी राजीनामा दिला असला, तरी अशा व्यक्तीला पक्षात स्थान देणाऱ्या चव्हाणांच्या मानसिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रदेशाध्यक्षपद जाणार की राहणार?
नगर परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले असले तरी, हे यश ‘नैतिकतेचा बळी’ देऊन मिळवल्याची भावना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. चव्हाणांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि निर्णयामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकांनंतर रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावरून गच्छंती निश्चित मानली जात आहे.
