साहित्य

डोंबिवली: “नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवलीकर विजय गोखले ह्यानी लिहिलेल्या व ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अजेय गडकरी ह्यांच्या हस्ते शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी ब्राह्मण सभा, डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले.

नानी पालखीवाला ह्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारे हे पुस्तक लहान थोर सर्वानी वाचावयास हवे असे उद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजेय गडकरी ह्यांनी काढले. विजय गोखले लिखित “नानी पालखीवाला एक सहृदयी, सुसंस्कृत वकील” ह्या ग्रंथाली प्रकाशनाच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजेय गडकरी अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.

स्वामी विवेकानंद विधी महाविद्यालय डोंबिवलीच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड, विख्यात सनदी लेखापाल श्री. संजीव ब्रम्हे, ग्रंथालीचे विश्वस्त श्री. सुदेश हिंगलासपूरकर ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

नानी पालखीवाला ह्यांची कौटुंबिक पार्श्वभुमी, त्यांचा वाचनाचा छंद, देशासाठी त्यांनी केलेली वकिली, टाटा समूहातील त्यांचे कार्य, त्यांचे जीवन विषयक तत्वज्ञान, त्यांची सुसंस्कृतता व आध्यात्मिक वृत्ती, त्यांचा दानशूरपणा व त्यांची ग्रंथसंपदा ह्यांची माहीती देणारे हे चरित्रात्मक पुस्तक आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानी ते वाचून त्यांचे गुण आपल्या अंगी बाळगावयास हवेत असे न्यायमूर्ती अजेय गडकरी ह्या प्रसंगी म्हणाले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ वकील श्रीकांत गडकरी, ज्येष्ठ समाजसेवक व डोंबिवलीच्या वाटचालीचे साक्षीदार श्रीकांत पावगी, ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र लोहकरे, डॉ. ललिता नामजोशी, शशिकांत भाटे, डॉ. पेटकर, डॉ. निखिल सातभाई, रोटरी क्लबचे शैलेश गुप्ते, पर्यावरण प्रेमी वर्षा शिखरे, संत साहित्याच्या लेखिका रजनी परचुरे, ज्येष्ठ विचारवंत श्रीकांत कुलकर्णी, आर्किटेक्ट भिंगारडे, मानसी मडके इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

ह्याप्रसंगी ठाणे येथील नामवंत सनदी लेखापाल श्री. संजीव ब्रह्मे आणि स्वामी विवेकानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड ह्या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. श्री. ब्रह्मे व डॉ. गावंड ह्यांनी पालखीवाला ह्यांचे शैक्षणिक कर्तृत्व, वकीली कसब, त्यांची अंदाजपत्रकावरील भाषणे, त्यांचा दानशूरपणा ह्याविषयी माहिती दिली.

ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी ग्रंथालीच्या पन्नास वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेऊन आगामी काळातील कार्यक्रमांची माहीती दिली व डोंबिवलीकर नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सौरभ सोहोनी ह्यांनी केले.