Saturday, January 17, 2026
Latest:
राजकीय

महाराष्ट्राने बिहारलाही मागे टाकले! उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलीसांसमक्ष `साम-दाम-दंडा’चा वापर

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपा व शिंदे सेना युतीचे ३३ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. अखेरच्या दिवशी ठिकठिकाणी झालेले माघारी नाट्य पाहता महाराष्ट्राची स्थिती बिहारपेक्षा भयानक झाल्याचे जाणवले. पोलिसांच्या उपस्थितीत पैसे वाटप, माघार न घेणार्‍या उमेदवाराला मारहाण असे प्रकार महाराष्ट्रातील निवडणुकीत प्रथमच पहायला मिळाले. हे सर्व प्रकार पाहून अनेक मतदार संतप्त झाल्याचे चित्र होते.

https://youtu.be/g7qUKUZzFFA?si=cLCf1N_vnQlQNybY

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र खुलेआम साम-दाम-दंडाचा वापर करण्यात आला. त्यातूनच माघारीचे आणि बिनविरोधचे नाट्य रंगले. उमेदवारी मागे घेणार्‍या अनेक अपक्ष तथा विविध पक्षिय उमेदवारांसमोर राशीच्या राशी ओतण्यात आल्या. हवे तेवढे घ्या पण माघार घ्या, हाच धोशा लावण्यात आला. प्रसंगी दहशतीचाही वापर करण्यात आला.
सर्वांत विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली परिसरात एका खासदाराचा स्वीय सहाय्यक या मोहिमेवर होता.

रात्रभर विविध उमेदवारांच्या घरी जावून मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली. अनेकांनी सांगितल्याप्रमाणे या मंडळींबरोबर पैसे वाटण्यासाठी आलेले वाहन होते आणि त्याला पोलीस बंदोबस्तही होता. एखादा उमेदवार सहजासहजी माघार घेत नाही असे दिसताच सर्व मार्गांनी त्याच्यावर दडपण आणण्यात आले. एवढे होवूनही अनेक उमेदवार बधले नाहीत.

कल्याणच्या रामबाग मुरबाड रोड परिसरातील ठाकरे सेनेचा एक उच्चशिक्षित उमेदवार बधत नाही असे बघितल्यानंतर त्याचा भाऊ महाराष्ट्र शासनात उच्चपदस्थ अधिकारी आहे. त्याला दूरध्वनी करण्यात आले. `भावाला उमेदवारी मागे घेण्यास सांगा, अन्यथा त्रास होईल’ वरिष्ठ नेत्यांपासून मंत्र्यांचेही फोन त्याच्याकडे धडकले.

एवढे करुनही माघार घेत नाही म्हटल्यावर रात्रभर त्याच्या घरी घिरट्या मारण्यात आल्या. `कुठे गेला’ म्हणून विचारणा करण्यात आली. `हवे तेवढे घ्या, पण उमेदवारी मागे घ्या’ हाच आग्रह होता. रामबागेतील त्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली असती तर शिंदे सेनेच्या उमेदवाराचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला असता.

रामदासवाडी भागातील एका महिला उमेदवाराकडे पहाटे दोन वाजता ही मंडळी धडकली. सोबत सुमारे दीड कोटी आणल्याची चर्चा होती. परंतु त्या ठाकरे सेनेच्या उमेदवाराने पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर `तुम्ही सांगा, किती हवेत, शिवाय महामंडळ देतो’ असेही सांगितले. परंतु तरीही त्या उमेदवाराने नम्रतापूर्वक नकार दिला. विशेष म्हणजे हा उमेदवार भाजपाकडून अन्याय झाला म्हणून ठाकरे सेनेतर्फे उभा आहे.

कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र.७ मध्ये शिंदे सेनेचे पदाधिकारी मोहन उगले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मोहन उगले माघार घेत नाहीत असे पाहताच शिंदे सेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वरातच काढली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेतल्या जाणार्‍या इमारतीत नेऊन मारहाण करण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना आणतांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे आणण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व पोलीसांच्या उपस्थितीत सुरु होते.

या ठिकाणी त्या खासदाराचा स्वीय सहाय्यक अर्थपूर्ण वाटाघाटीसाठी तयारच होता. महापालिका इमारतीत सामान्य नागरीकांना सोडले जात नव्हते. उमेदवारांबरोबरही कोणाला जाऊ देत नव्हते. तरीही गुंडपुंड व गुडघ्याला बाशिंग बांधलेले अनेक भावी आपल्या सहकार्‍यांसह खुलेआम महापालिका इमारतीत जावून धूडगुस घालत होते.

जोशी बागेतील ठाकरे सेनेच्या महिला उमेदवाराला जबरदस्ती आणून अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले. आपला पती सांगत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी त्यांची भूमिका होती. परंतु त्यांना खेचत खेचत नेऊन उमेदवारी मागे घेण्यास लावली.

याच प्रभागातील भाजपाच्या कार्यक्षम नगरसेविका वैशाली पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला, परंतु वरिष्ठांनी त्यांची फसवणूक केली. एबी फॉर्म देतांना तो शिक्का मारुन दिला नाही. परिणामी त्या निवडणुकीपासून बाहेर फेकल्या गेल्या.

विशेष म्हणजे वैशाली पाटील यांनी उमेदवारी मागे घेवू नये अशा सक्त सूचना प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षानी दिलेल्या असतांनाही कार्यकर्त्यांनी त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. प्रभागात भाजपाच्या दोन उमेदवारांचा मार्ग सुकर होण्यासाठी हे सर्व घडल्याची चर्चा होती.

अधिकृत उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले.
भाजपाचे पॅनल क्र. ७ चे अधिकृत उमेदवार डाॅ.उपाध्याय यांना धमकावून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्यात आले.त्यांच्या कुटुंबीयांसही धमकवण्यात आल्याचे सांगितले जाते.भाजपाच्या एका माजी नगरसेवकाला त्या प्रभागातून लढायचे असल्याने मार्गातील काटा दूर करण्यात आला.आणखी एक उमेदवार टूमकर यांनी भरलेले दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले.भाजपाकडून असे प्रकार अपेक्षित नव्हते अशी प्रतिक्रिया भाजपाच्याच मंडळींनी दिली.या सर्व प्रकाराने उपस्थित नागरीक व्यथित झाल्याचे दिसत होते. अशा उमेदवारांना निवडणुकीत पाडले पाहिजे अशी भावना होती.

निवडणुकीचा नवा फंडा
गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदारांना पाच ते पंचवीस हजार वाटले जात होते. शिवाय प्रचार करणे, धावपळ करणे हे सर्व करत बसण्यापेक्षा विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांना पाच लाख ते दोन कोटींपर्यंत त्यांच्या त्यांच्या वकुबाप्रमाणे दिल्यास निवडणुक जिंकणे सोपे जाते हा नवा फंडा आता रुढ होत आहे. याचाच अर्थ आपण बिहारपेक्षाही पुढे गेलो आहोत आणि सर्वात विशेष म्हणजे हे सर्व प्रकार गृहखात्याच्या नाकावर टिच्चून किंवा संमतीने घडत तर नाही ना? अशी मतदारांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

वर दिलेली उदाहरणे ही नाममात्र आहे यापेक्षाही अनेक प्रकार अनेक प्रभागांमध्ये घडले आहेत. सत्ताधार्‍यांना सर्व काही करण्यासाठी मोकळीक असल्याचे दृश्य आज जागोजागी दिसून आले. असे उमेदवार उद्या निवडुन आल्यानंतर नागरीकांची कामे करतील का ? याबाबत प्रश्नचिन्हच आहेत. हे प्रकार न रोखल्यास पुढील निवडणुका कठीण आहेत.

मनसे नेत्याची संशयास्पद भूमिका ?
मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांच्या भूमिकेबद्दल मनसेचेच कार्यकर्ते संधिग्न असल्याचे दिसले. एकीकडे ठाकरे बंधूंची युती केल्याचा देखावा करायचा आणि आतून भाजपाला मदत करायची असे तर नाही ना? अशीही चर्चा सुरु होती.
निवडणुक जाहीर झाल्यापासून राजू पाटील यांनी आपले घर राज ठाकरे यांच्या घरी जाण्याव्यतिरिक्त सोडले नाही. युतीच्या बोलण्यापासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंत सर्व काही घरातूनच सुरु होते.

युतीत कोणत्या जागा कोणाला ठरल्या याचा पत्ता दोन्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनाही नव्हत्या. त्यातूनच अनेक र्ठिकाणी समज गैरसमज आणि बंडखोरीचे नाट्य घडले. डोंबिवलीचे शहराध्यक्ष हे एक माजी नगरसेवक वकील असतांनाही त्यांनी महेश पाटील यांच्यासाठी उमेदवारी का मागे घेतली याचे गणित अनभिज्ञ आहे.

ठाकरे सेनेचे पदाधिकारी संशयात
डोंबिवलीतील ठाकरे सेनेचे काही प्रमुख पदाधिकारी संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. डोंबिवलीतील `दादा’समोर कमकुवत उमेदवार देणे, शिंदे सेनेशी निष्ठा असलेले उमेदवार देणे, सर्व काही संशयास्पद आहे.

डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकारी ठाकरे सेना सोडून गेले. अशा वेळेस निवडणुकीची जबाबदारी अन्य अनुभवी मंडळींना दिली नाही. एवढी पडझड होवूनही संपर्कप्रमुख व नेते देतांना त्यांची कुवत विचारात घेतली नाही. त्यामुळे प्रामुख्याने डोंबिवलीत मोठा फटका बसला. डोंबिवलीतील दुसर्‍या फळीच्या पदाधिकार्‍यांना कायम बाजूला ठेवून ठराविक चार-पाच पदाधिकारी आपल्याला हवे तसे वागल्याने मोठा फटका बसला.

उपतालुका प्रमुख राहुल भगत गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे सेना वा भाजपात जाणार असे जाहीरपणे सांगत असतांना त्यालाच उमेदवारी दिली आणि त्याने माघार घेवून भाजपाचा मार्ग मोकळा केला व लगोलग भाजपात प्रवेश केला. ठाकरे सेनेच्या एकाही वरिष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांना काय वाटते ? याचा विचार केला नाही. डोंबिवलीत पूर्वी राहणारा व आता मुंबईत नेता झालेल्या एका नेत्याने विनाकारण ढवळाढवळ केल्याचा आरोप होत आहे.

एकीकडे शिवसेना मनसे युती होत असतांना ठाकरे सेनेचेच नेते आपल्याच उमेदवाराला माघारी घेण्याचे आदेश देत होते. मातोश्रींवरुन बोलावून फक्त उमेदवारी मागे घ्या एवढे सांगितले जात होते. काही नेत्यांच्या मुलांसमोर मनसेने बंडखोरी केल्याने त्यांना ठाकरे सेनेपेक्षा मनसे सांभाळणे महत्त्वाचे होते.

शिंदेंची यशस्वी खेळी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेळी मात्र यशस्वी झाली. चर्चेमध्ये भाजपाला गुंडाळून हव्या त्या जागा पदरात पाडून घेतल्या. कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. शिवाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या पाठीमागे तन-मन-धनाने उभे राहिले. हा प्रकार ठाकरे सेनेत अजिबात दिसून आला नाही.

तरीही अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जे घडले ते भयानक होते. लोकशाही संपत चालल्याची चाहूल होती. आमची सत्ता असल्याने आम्ही काहीही करु शकतो अशी गुर्मी होती. या सर्व प्रकारांना आता जनतेनेच पायबंद घातला पाहिजे, अन्यथा पुढे होणारे परिणाम भयानक होणार आहेत.

 

साभार – दैनिक जनमत चे संपादक तुषार राजे यांच्या फेसबुक बॉल वरून