वसईच्या शाळेत येशूच्या ‘चमत्कारांचे’ नाट्य; हिंदु जनजागृती समिती आक्रमक, गुन्हा नोंदवण्याची मागणी
वसई (पूर्व) येथील ‘होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल’मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने आंधळे आणि लंगडे लोक बरे होत असल्याचे नाट्य सादर करण्यात आले. या प्रकारामुळे शैक्षणिक संस्थेत अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा आरोप करत ‘हिंदु जनजागृती समिती’ने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी संबंधित शाळा प्रशासनावर ‘महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी समितीने केली आहे.
नेमका प्रकार काय?
३१ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एक नाट्य सादर केले. यात येशूच्या स्पर्शाने असाध्य आजार बरे होत असल्याचे दाखवण्यात आले. या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून वादाला तोंड फुटले आहे.
(व्हिडिओ संदर्भ:
https://youtu.be/0Qp2Q7Yv7ik)
धर्मांतराचे षड्यंत्र असल्याचा आरोप
हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी वसई-विरार पोलीस उपायुक्त आणि माणिकपूर पोलीस निरीक्षकांना प्रत्यक्ष निवेदन दिले आहे. “शाळेत अशा प्रकारे अवैज्ञानिक चमत्कारांचे प्रदर्शन करणे हे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ नुसार दंडनीय अपराध आहे. मुलांच्या कोवळ्या मनावर अंधश्रद्धा बिंबवून येशूविषयी खोटा प्रभाव निर्माण करणे आणि त्या माध्यमातून धर्मांतराचे षड्यंत्र रचणे, असा हा प्रकार आहे,” असे समितीने निवेदनात म्हटले आहे.
कठोर कारवाईची मागणी
समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शिक्षण हे विवेक जागृत करणारे असावे, अंधश्रद्धा पसरवणारे नाही. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास बाधित होतो.”
समितीने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:
१. शाळा प्रशासनाची सखोल चौकशी व्हावी.
२. मुख्याध्यापकांचे तात्काळ निलंबन करावे.
३. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा.
४. सर्व शाळांसाठी अशा प्रकारच्या कृत्यांना रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात.
हे निवेदन देताना समितीचे विलास निकम, प्रशांत पाटील, अतुल मेहता, संदीप तुळसकर आणि जामकर उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता यावर प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
