मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नाविक दलाची पाहणी
विक्रमादित्य या विराट नौकेवरून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समुद्रातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे,पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह आमदार तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी केली. या वर्षापासून नाविक दलाने मंत्री, आमदार, महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासाठी समुद्र सफर आयोजित केली आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी नौदलाचे अभिनंदन केले आणि नौदल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले. देशाच्या प्रादेशिक, समुद्री आणि आर्थिक हितसंबंधाच्या संरक्षणासाठी सशस्त्र दलाच्या भूमिकांची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी पाणबुडी आयएनएस कलावरी आणि आयएनएस विद्सुत याद्वारे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वांचे स्वागत केले. शिपबॉर्न एंट्री सबमरीन वारफेअर सिकिंग, ए.यू. कामोव्ह हेलिकॉप्टर आणि मिग 29 के विमानाद्वारे हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या कामकाजाची व्याप्ती आणि याविषयी विस्तृत माहिती प्रमुख उपस्थितांना देण्यात आली.