युवकांनी स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास बाळगावा- भगतसिंह कोश्यारी

मुंबई- गेल्या आठ वर्षांत देशामध्ये नाविन्यतेचा विशेषत्वाने पुरस्कार केला जात असून स्टार्टअप्सना चालना देण्यात येत आहे. अशावेळी युवकांनी स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास बाळगून वाटचाल करावी.‌ राज्याच्या अर्थविभागाने स्टार्टअप्स उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केली.

हेही वाचा :- सावधान ! मुंबईत डोळ्यांची साथ

महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ २०२२ तसेच ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ विजेता सन्मान सोहळा राजभवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.‌ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मार्गदर्शक डॉ रघुनाथ माशेलकर यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा :- हलाल’ चा शिक्का असलेली उत्पादने खरेदी करू नका

केळी तसेच इतर कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज मोठे मूल्य मिळत आहे. किसान रेल्वेमुळे कृषी उत्पादन शेतीपासून ते थेट बाजारापर्यंत नेण्याची सोय केली जात आहे. युवकांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून मातृभूमीसाठी समर्पण भावनेने कार्य करावे, असे आवाहनही राज्यपाल कोश्यारी यांनी केले.

देशातील ८०,००० स्टार्टअप्स पैकी ५०,००० एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तसेच १०० कोटी आणि अधिक भांडवल असणाऱ्या १०० युनिकॉर्न कंपन्यांपैकी २५ कंपन्या राज्यातील आहेत, त्यामुळे महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी आहे असे फडणवीस यांनी सांगितले.‌ राज्याचा अर्थमंत्री या नात्याने आपण प्रत्येक नवीन स्टार्टअप प्रस्तावाला आर्थिक पाठबळ देऊ, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. 

हेही वाचा :- कडोंमपा कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान

राज्यात ८७५ औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यांचा कायापालट करून एक वर्षात त्या ठिकाणी नवनवे अभ्यासक्रम सुरु केले जातील असे  कौशल्य आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. भारतातील कंपन्यांनी आता इतरांचे अनुकरण न करता सर्वसमावेशक नावीन्यतेचा ध्यास घ्यावा असे आवाहन डॉ. माशेलकर यांनी केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजकांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा २०२२ पुरस्कार तर उपमुख्यमंत्री फडणवीस, कौशल्य, पर्यटन मंत्री लोढा यांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ‘स्टार्टअप वीक स्टोरीज’ या  पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published.