डोंबिवलीत रंगणार युवा शास्त्रीय संगीत महोत्सव
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०१ – कल्याण गायन समाजातर्फे कल्याणमध्ये ७ ते ९ डिसेंबरमध्ये देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंडित उल्हास कशाळकर, डॉ. एल् सुब्रमण्यम पंडित विभव नागेशकर, अमान अली बंगश, भारती प्रताप आणि जयतिर्थ मेवूंडी यांसारखे ज्येष्ठ कलाकार सहभाग घेणार आहेत. याच धर्तीवर सद्या आघाडीवर असणाऱ्या युवा कलाकारांना लोकांसमोर आणावे म्हणून डोंबिवलीत युवा शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा :- शेकडो भाविकांच्या उपस्थितीत डोंबिवलीत तिरुपती बालाजीचा दर्शन सोहळा संपन्न
यामध्ये तबलावादक तनय रेगे, व्हायोलिन वादक मानस कुमार आणि सारेगम फेम गायिका केतकी चैतन्य हे सहभागी होणार आहेत. २ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्वांना या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश असणार आहे. रघुलीला एंटरप्रायझेस, अभिव्यक्ती मधुमालती एंटरप्रायझेस, लक्ष्मीनारायण संस्था आणि देवगंधर्व महोत्सव संयोजन समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हे या महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीतील रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे द्या ..
तनय रेगेच्या एकल तबलावादनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्याला गुरुप्रसाद गांधी साथ करणार आहे. तर केतकी चैतन्यच्या शास्त्रीय गायनाला तबलावादक प्रवीण करकरे आणि ज्ञानेश्वर सोनवणे साथ करणार आहेत. डोंबिवलीमध्ये गेल्यावर्षी देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन केल्यानंतर त्यानिमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी महोत्सव कल्याणला होत असला तरीही डोंबिवलीमध्ये हा प्रयोग रंगणार आहे. गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून तरुण कलाकारांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शास्त्रीय संगीतामध्ये कार्य करणाऱ्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या कलाकारांना लोकांसमोर व्यासपीठ देण्याचा या कार्यक्रमाचा प्रयत्न आहे. सर्व रसिक आणि कलाप्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन देवगंधर्व महोत्सवाचे अध्यक्ष माधव जोशी आणि उपाध्यक्ष संदीप वैद्य यांनी केले आहे