कांदिवलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

मुंबई : कांदिवली येथे इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (आज) सोमवारी सकाळी घडली. कांदिवली पश्चिम येथील गणेश नगर मधील के. डी. कंपाऊंड भागात ही घटना घडली. विकासक रूपारेल बिल्डर यांच्या निर्माणाधीन या इमारतीवरुन १ कामगार पडल्याची माहिती समोर आली आहे. या कामगाराला शताब्दी रूग्णाल्यात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कांदिवली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी अधिक माहिती न दिल्यामुळे कामगाराचे नाव कळू शकले नाही.

हेही वाचा :- कल्याण- अहमदनगर महामार्गावर अद्न्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यु

दरम्यान, सदर अपघात हा विकासक आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवासी अमिन इद्रीसी यांनी केला आहे. याआधी याच ठिकाणी २९ मार्च रोजी वीजेच्या धक्क्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी केलेल्या तक्रारीची दखल पोलीस आणि एसआरएच्या अधिका-यांनी घेतली नाही. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी निर्माणाधीन इमारतीच्या खड्ड्यामध्ये पडून आदित्य सिंह या ७ वर्षीय मुलाचा जून महिन्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी स्थानिकांना दिले होते.

हेही वाचा :- नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल पाठवा – कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत

मात्र आजमितीस कोणतीही कारवाई झालेली नाही, असे मुंबई युवक काँग्रेसचे सचिव दिपक यादव यांनी सांगितले. या कामगाराच्या मृत्यूला बिल्डरच जबाबदार असल्याचा आरोप परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष राजकिशोर तिवारी यांनी केला आहे. आधी कुत्र्याचा बळी घेतला. नंतर निष्पाप ७ वर्षीय बालकाला आपल्या प्राणास मुकावे लागले. या २ गंभीर घटनांची दखल कोणीही घेतली नाही. त्यामुळे आज तिसरी दुर्घटना घडली. या विकासकावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या गंभीर घटनांकडे दुर्लक्ष करणा-या सर्व दोषी अधिका-यांवरही कारवाई करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.