महिला सशक्तीकरण हा केवळ राष्ट्राचे नव्हे तर विश्वाचाही अजेंडा- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.१६ – सर्वसमावेशक, न्यायसंगत तसेच शाश्वत विकासाचा उद्देश साध्य करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण हा केंद्र बिंदू आहे व हा केवळ आपल्या राष्ट्राच्या नव्हे तर विश्वाच्या अजेंड्यावर आहे, असे वक्तव्य उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज केले. ‘महिलांचे सक्षमीकरण: उद्योजकता, नवीन उपक्रम व स्थिरता यांना प्रोत्साहन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या परिषदेचे आयोजन नीती आयोग व श्री राम महाविद्यालय यांनी केले होते. याप्रसंगी पुददुचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश त्यागी, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत व इतर मान्यवर उपस्थित होते.
महिलांना योग्य वातावरण व संधी दिल्या जात नसताना त्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर कामगिरी करून दाखवतात. समाजाच्या फायद्यासाठी महिलांचा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक व सार्वजनिक सक्रीय सहभाग वाढविण्यासाठी सुयोग्य सुविधा द्यायला हव्यात, यावर त्यांनी जोर दिला.
चित्रपटांसारखे माध्यम महिलांना समान संपत्ती हक्क देण्याच्या दृष्टीने, महिला सशक्तीकरणात महत्वाची भूमिका बजावू शकते. समान हक्क, संधी, सुविधा यांचा अभाव, लैंगिक अत्याचार, शिक्षण, रोजगारात होणारा भेदभाव, घरकाम हे महिलांच्या प्रगतीमधील मुख्य अडथळे आहेत, अशी भवन उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली.
निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभागामुळे शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगार व सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात सकारात्मक प्रभाव दिसून येतो आहे. महिला सबलीकरणाने केवळ महिलांच्या आयुष्यात फरक पडत नाही तर संपूर्ण कुटुंब व समाज त्यामुळे बदलतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुलींच्या शिक्षणावर जोर देताना ते म्हणाले, मुलींच्या शिक्षणामुळे बालमृत्यू दरात घट दिसून येण्यासोबतच कुटुंब स्वास्थ्यामध्ये सुधारणा झाली आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील संधी दिली गेली तर मालमत्ता, शेतीतील उत्पादन वाढेल व कुपोषितांची संख्या कमी होईल.