ठाण्यात मात्र आमच्या लोकांनी तो ‘चोपून’ खाल्ला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला दिला

ठाणे दि.१४ – तुम्ही आंबा कापून खाता की चोखून, असा प्रश्न कॅनेडियन नागरिक अक्षयकुमार याने पंतप्रधानांना विचारला होता. ठाण्यात मात्र आमच्या लोकांनी तो ‘चोपून’ खाल्ला, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांना लगावला. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते बोलत होते. आंब्याचा स्टॉल लावण्यावरून ठाण्यात झालेल्या मनसे – भाजपच्या वादावर ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शहरात त्यांचे स्टॉल लावून विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मग त्या आंबा विक्रेत्याने काय घोडे मारले होते? शहरात भाजीपाला विकून शेतक-यांना चार पैसे मिळणार असतील, तर त्यांना त्यांचा व्यवसाय करू दिला पाहिजे. ते काही कायमचा स्टॉल लावणार नाहीत.  शेतक-यांचे भले होत असेल, तर यात पक्षीय राजकारण आणायला नको, असेही त्यांनी सुनावले.  या पार्श्वभूमीवर मनसेच्या स्थानिक नेतृत्वाखाली राज्यातील शेतक-यांचा १७ मे रोजी मोर्चा काढला जाईल.

हेही वाचा :- आम्ही आंबा ‘चोपून’ खाल्ला; ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा टोला..

त्यात मी सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने महाराष्ट्रातील तरुणांशी राजकारण केले. मराठा आरक्षण मिळणारच नव्हते. हा विषय न्यायालयात जाणे निश्चित होते. मात्र त्यावर राजकारण करून सरकारला तरुणांची फसवणूक करायची होती. जो विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे, त्याची घोषणा राज्य सरकारने कशी केली, असा सवाल करत, खाजगी आणि सरकारी नोक-यांसह शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील तरुणांना प्राधान्य दिल्यास महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच राहणार नाही, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली. एक लाख २० हजार विहिरी राज्यात बांधल्याचा दावा सरकारकडून केला जातो. तरीही राज्यातील सुमारे २९ हजार गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागत असतील, तर त्या विहिरी कुठे आहेत, हे तपासले पाहिजे. मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना, सिंचनाचा पैसा गेला कुठे़, असा सवाल त्यांनी केला. दुष्काळी दौ-यावर जाणा-या नेते मंडळीना राज यांनी धारेवर धरले. डिजिटल युगात एका क्लिकवर सर्व माहिती मिळत असताना, अभ्यास दौरे करणा-या नेत्यांना त्यांनी काय अभ्यास केला, हे पत्रकारांनी विचारायला हवे, असे त्यांनी सुचवले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email