हॉटेल बिल देण्यासाठी एटीएम कार्ड दिलेल्या ग्राहकांना वेटरने लावला लाखोंचा चुना, 8 वेटर्स अटक

पुणे – पंचतारांकित हॉटेल्समध्ये एटीएम कार्डने पैसे भरण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र याच हॉटेल्समधून हॉटेल बिल देण्यासाठी एटीएम कार्ड दिलेल्या शेकडो ग्राहकांना वेटर्सनी लाखोंचा चुना लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई मधील बांद्रा पोलिसांनी नुकताच कॅशलेश हॉटेलिंगचा मोठा घोटाळा उघडकीस आणला असून त्याचे धागेदोरे पुणे, सासवड या शहरांपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सहा वेटरांसह आठ जणांना अटक केली आहे.सदर आरोपींनी एकूण ८५ बँकेच्या एकूण १ हजार २८ ग्राहकांची माहिती चोरून त्यांचे पैसे काढल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील हॉटेल गारवाचा वेटर अब्दुल गफार अन्सारी (वय २७), खुर्शीद बशीर अन्सारी (वय २७), मुंबर्इतील अंधेरी पश्चिम मधून वेटर सफुद्दीन लियाकत अंसारी (वय २४), शमीम लियाकत अंसारी (वय ३६), साकीनाका येथून केशव मगता रेड्डी (वय २३), नालासोपारा येथील रिझवान मेहबूबअली सय्यद (वय २४), भायखळातील मुशरफ अली इफाजत अली सय्यद, सांताक्रुज येथून वेटर विकास कुमार सदानंद साहू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्या ताब्यातून चार स्कीमर्स, डिकोडर व वेगवेगळ्या बँकेचे चालू व मुदत संपलेले एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
सिटी बँकेचे क्रेडिट कार्ड असलेल्या मुंबर्इतील मालाड येथील सिध्दी संग्राम नलावडे ही महिला घरी असताना व त्यांच्या बँकेचे एटीएम कार्ड त्यांच्याकडे असतानाही तिच्या खात्यावरून २२ हजार ५०० रुपये काढण्यात आले होते.

तसेच इतर ग्राहकांचे सुमारे ४० हजार रुपये अशाच प्रकारे चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यानंतर सिटी बँकेच्या तपास पथकाने याबाबत सखोल चौकशी केली. तसेच बँकेचे मॅनेजर रामप्रकाश बरर्इ यांनी बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हा घोटाळा उघड़कीस आला.

वाकड येथील एका तरुणीच्या सिटी बँकेच्या एटीएम कार्डवरून नुकतेच मुंबर्इतून एक लाख ९५ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले होते. सदर तरुणीच्या ताब्यातच एटीएम कार्ड असताना व तिने एटीएमचा पिन नंबर कोणासही सांगितलेला नसताना, पैसे खात्यातून गेल्याने ती चक्रावलेली होती.

*दरम्यान, नागरिकांनी हॉटेलमध्ये अथवा दुकानांमध्ये जाताना, एटीएम कार्डने बिलिंग हे स्वत:समोर कार्ड स्वाइप करून करावे. त्यावेळी पिन क्रमांक कोणाला समजणार नाही अशाप्रकारे टाकण्याची काळजी घ्यावी. एटीएम कार्डवरील मॅग्नेटिक स्ट्रीपवरील माहिती स्कीर्मसच्या साहाय्याने तत्काळ कॉपी होऊ शकते त्यामुळे ग्राहकांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे*

बिल देण्यासाठी ग्राहक एटीएम कार्ड वेटरजवळ देत असतात. बिलिंग करण्यासाठी गेलेला वेटर, ग्राहकाने दिलेला पिन नंबर लक्षात ठेवून, स्कीमर्सच्या साहाय्याने एटीएम कार्डवरील सर्व मॅग्नेटिक स्ट्रीपवरील डाटा कॉपी करून घेतो. नंतर सर्व डाटा दुसऱ्या बनावट कार्डमध्ये त्याची कॉपी करतो व नवीन एटीएम कार्ड बनवले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.