ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुणे दि.२६ :- मराठी रंगभूमी, मराठी- हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणरे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी दुपारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे.

गोखले यांचा ७७ वा वाढदिवस गेल्या महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी झाला.‌ त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटात तर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गोखले यांनी काम केले होते.‌ चित्रपट आणि मालिकेतील ते त्यांचे अखेरचे काम ठरले. वडील चंद्रकांत गोखले, आजी कमलाबाई गोखले यांच्याकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला. मराठी रंगभूमीवरील ‘बॅरिस्टर’ हे नाटक गोखले यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरले.‌ सुमारे आठ वर्षे त्यांनी हे नाटक केले. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांकडून विशेष कौतुक झाले. २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाले होते. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून गोखले यांनी स्वत:ची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा नवा मानदंड प्रस्थापित केला होता. विक्रम गोखले हे स्पष्टवक्ते आणि परखड, ठाम विचारांसाठी प्रसिद्ध होते.

विक्रम गोखले यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी– ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे– चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीवर आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावरही गोखले यांनी अधिराज्य गाजविले.‌ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस– ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- एक कसदार राजबिंडा अभिनेता म्हणून त्यांनी रंगभूमी गाजविली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असत. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार– रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला.

 

गोखले यांची गाजलेली काही नाटके

महासागर, मी माझ्या मुलांचा, स़ंकेत मिलनाचा, नकळत सारे घडले, जावई माझा भला, कमला

 

गाजलेले मराठी चित्रपट

कळत नकळत, बाळा गाऊ कशी अंगाई, महानंदा, माहेरची साडी, नटसम्राट, वजीर

 

गाजलेले हिंदी चित्रपट

अग्निपथ, खुदा गवाह, थोडासा रुमानी हो जाए, हम दिल दे चुके सनम,

 

गाजलेल्या मालिका
अग्निहोत्र,

Leave a Reply

Your email address will not be published.