उद्धवजींची ‘अळी मिळी गुप चिळी’
महाविकास आघाडीचा ‘चौथा’ उमेदवार का पडला? याचे स्पष्टीकरण दिले तर शरद पवार आपला राजीनामाच मागतील, या भीतीपोटी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अळी मिळी गुप चिळी’ दिसतेय.
दस्तुरखुद्द रश्मी उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’मध्येही या विषयावर त्यांची प्रतिक्रिया नाही. आश्चर्य आहे. संपूर्ण महाराष्ट्र, मर्द मावळे, मर्द मराठे, तमाम शिवसैनिक उद्धवजींच्या टोमणेबाज विश्लेषणात्मक प्रतिक्रियेपासून वंचित राहिले आहेत.
अगदीच काही नाही तर त्यांनी आता फेसबुक लाईव्ह तरी करावे आणि राज्यसभेच्या निकालावरील सखोल प्रतिक्रिया द्यावी. नाही त्यांना शिवसैनिकांवरील प्रेमापोटी द्यावीच लागेल.
महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांची प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे आणि तशी ती आहेही. पण गंमत म्हणजे पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्याही प्रतिक्रिया आहेत.
पण महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिक्रिया मात्र नाही.
ही प्रतिक्रिया आली असती तर आजच्या रविवारच्याच (१२ जून २०२२) यायला हवी होती.
उद्धवजी या सगळ्या घडामोडींकडे कसे पाहतात?
भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या शब्दात फटकारे मारतात? काय टोमणे हाणतात, याची खरेतर उत्सुकता होती. पण उद्धवजींची ‘टोमणेगिरी’ वाचायला मिळाली नाही. कदाचित विधानपरिषद निवडणुकीत उद्धवजी काहीतरी चमत्कार घडवून भाजपच्या उमेदवारांनाच पाडतील आणि मग त्यानंतरच आपण ‘सामना’मध्ये उद्धवजींची
मॅरेथॉन मुलाखत घेऊ, असा उदात्त व दूरदृष्टीचा विचार कदाचित संजय राऊत यांनी केला असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच त्यांनी आत्ता लगेच उद्धवजींना या विषयावर बोलते केले नसेल. असूही शकते. संजय राऊत हे काहीही करू शकतात.
की शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत हे ही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिक्रिया घ्यायला विसरले?
की त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया द्या असे सांगितले आणि तरी उद्धव साहेबांनी दिली नाही?
की काय प्रतिक्रिया द्यायची, या बाबत शरद पवार किंवा त्यांच्या प्रिय सल्लागारांकडून काहीच सल्ला दिला गेला नाही? काय बोलायचे ते सांगितले नाही?
की हॅ, त्यात काय प्रतिक्रिया द्यायची? (मी म्हणतो ना संभाजीनगर ,मग संभाजीनगर असे नामांतर करण्याची गरजच काय? या चालीवर) असे उद्धव साहेब यांनी सल्लागारांचे न ऐकता स्वतःहूनच ठरविले?
काही कळायला मार्ग नाही. या बाकी सर्व मंडळींच्या प्रतिक्रिया अगदी ठळकपणे पान एकवर आहेत. उद्धव ठाकरे यांचीच प्रतिक्रिया नाहीये. अगदी भिंग घेऊन शोधली तरीही पान एकवर दिसली नाही.
उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत एक कबुली दिली होती. आणि ते एकदम बरोबर व खरे बोलले होते.
उद्धवजी म्हणाले होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावातील ‘बाळासाहेब’ हे नाव काढून टाकले तर माझी किंमत शून्य आहे. ‘सामना’कारांनी तेच नेमके मनावर घेऊन उद्धवजींची प्रतिक्रिया घेतली नाही की काय?
Pingback: पुण्यात महिलेवर बसमध्ये बलात्कार, बस दोन ठिकाणी थांबून… – मुंबई आस पास