निर्णयाचा पुनर्विचार करायला दोन ते तीन दिवसांचा वेळ द्यावा- शरद पवार
मुंबई दि.०२ :- माझा निर्णय सांगितला आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला पुन्हा विचार करायला दोन ते तीन दिवस द्या, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण अशा नेतेमंडळींनी शरद पवारांची ‘सिल्व्हर ओक’वर भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी नेतेमंडळींना त्यांची भूमिका सांगितली.
शरद पवार यांची भूमिका अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली. आपण शरद पवार साहेबांना दैवत मानतो. तेच म्हणाले मला २-३ दिवस द्या. तर आपण सगळ्यांनी त्यांचे ऐकले पाहिजे, असे सांगून अजित पवार म्हणाले, सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावे. इथे एकही कार्यकर्ता दिसता कामा नये. मला कुणी बसलेले दिसले तर मी माझा निर्णय बदलणार नाही.
कुणीही मुंबईत येण्याचा प्रयत्न करू नये. जे कुणी राजीनामे देत आहेत, त्यापैकी एकाचाही राजीनामा स्वीकारला जाणार नाही. नवीन प्रश्न निर्माण करू नका. उपोषणाला बसू नका. हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नासाठी ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा सामान्य नागरिकांना वेठीस धरू नका अशा सूचनाही शरद पवारांनी दिल्या असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.