कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक

१९ नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता कामाला सुरूवात
२० नोव्हेंबर रोजी लोकल फक्त भायखळा स्थानकापर्यंतच

मुंबई दि.११ :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षांचा जुना कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी २७ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या २० नोव्हेंबर रोजी उपनगरीय सेवा मुख्य मार्गावर भायखळय़ापर्यंत, तर हार्बर मार्गावर वडाळय़ापर्यंतच सुरू राहणार आहे. लांब पल्ल्याच्या ३६ गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत.

धोकादायक झालेला कर्नाक बंदर उड्डाणपूल पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता सुरू होणार असून २१ नोव्हेंबरला मध्यरात्री दोन पर्यंत हे काम चालणार आहे. परिणामी या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कसारा, खोपोली येथून येणाऱ्या लोकल भायखळा, परेल, दादर आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील आणि येथूनच परतीच्या मार्गावर सोडण्यात येतील. तर हार्बरवर पनवेल येथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून येथूनच पुन्हा डाउन दिशेला सुटणार आहेत. या काळात वातानुकूलित लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईत १९ नोव्हेंबर रोजी येणारी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मुंबई-नांदेड तपोवन, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी, मुंबई-जालना जनशताब्दी, मुंबई-मनमाड विशेष गाडी, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेससह अन्य काही लांब पल्ल्याच्या गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी मुंबईऐवजी पनवेल येथून सुटतील, तर काही गाडय़ा दादर, तसेच पुण्यातून सोडण्यात येणार आहेत. मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस, हावडा, फिरोजपूरसह, इंद्रायणी एक्स्प्रेस, मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस यासह अन्य गाडय़ा दादर आणि पनवेलपर्यंतच चालवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.