ठाण्यात पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन

ठाणे दि.०१ :- ठाण्याच्या समृद्ध भूमीत कलेचा आणि कलावंताचा सन्मान करणारा, शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जोपासणा-या प्रतिष्ठेच्या पं. राम मराठे संगीत महोत्सवाला यावर्षी दिनांक ६ डिसेंबर २०१९  पासून सुरुवात होत आहे. ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,ठाणे शाखा यांच्या सहकार्याने या संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य,नाट्य, गायन,वादन आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने यंदाचा पं.राम मराठे संगीत महोत्सव साजरा होणार आहे. दिनांक ६ डिसेंबर २०१९ ते ८ डिसेंबर, २०१९ या कालावधीत या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे  हा  संगीत समारोह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. 

हेही वाचा :- २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व मालमत्ता करांबाबत ग्रामस्थांचा संघर्ष सुरू

या संगीत स्मृती समारोहाचे उद्घाटन शिवसेना विधिमंडळ गटनेते, शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, जेष्ठ गायक प्रभाकर कारेकर, खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, प्रमोद पाटील, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.  यावेळी उपमहापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर ब्रम्हा पाटील, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा :- Dombivali ; बेडरूममधील पलंगावर विषारी सापाला पाहून कुटूंबाची उडाली झोप

संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०१९ रोजी रात्रौ ७.00 वाजता  प्रसिद्ध बासरी वादक सुरमणी विवेक सोनार यांच्या बासरी वादनाने होणार आहे. त्यानंतर संगीतभूषण पं.राम मराठे स्मृती पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रख्यात गायक उस्ताद राशिद खान यांच्या गायनाने पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोप होणार आहे. 

हेही वाचा :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स; गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोप

शनिवार दिनांक ७ डिसेंबर २०१९ दुपारी ४ .३० वाजता श्रीमती दीपा पराडकर(मुंबई) यांच्या गायनाने सत्राची सुरूवात होणार आहे. त्यानंतर श्रीमती श्रद्धा शिंदे यांचे कथ्थक नृत्याचे  सादरीकरण  होणार आहे. सायंकाळी ६.०० वाजता श्रीमती यशश्री कडलासकर(पुणे) आणि रमाकांत गायकवाड(पुणे) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. दुस-या दिवसाचे सत्र रात्रौ ८.३० वाजता सुरू होणार असून पं.राजेंद्र गंगाणी हे कत्थक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.  रविवार दिनांक  ८ डिसेंबर २०१९  रोजी दुपारी ४.३० वाजता पं. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘वसंत-वैभव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक पं.विजय कोपरकर व पं.सुरेश बापट हे पं. वसंतराव देशपांडे यांच्या वैभवशाली संगीताचा ठेवा रसिकांसाठी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर करणार आहेत.

हेही वाचा :- कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले बिनविरोध विधानसभा अध्यक्ष
 
सायंकाळी ६ वाजता स्वरांगी मराठे व प्राजक्ता मराठे यांचे सहगायन होणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रख्यात गायिका विदुषी डॉ.प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या संगीत समारोहासाठी प्रवेश विनामुल्य असून रसिकांना प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी एक तास आधी गडकरी रंगायतन येथे उपलब्ध होतील. तरी ठाण्याच्या संगीतप्रेमी रसिकांनी या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिका तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email