पुण्यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांची लॅंड माफियाला साथ : निवृत्त निरीक्षक चा खळबळजनक आरोप

Hits: 0

 

पुणे : रश्मी शुक्ला, परम बीर सिंग या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वादग्रस्ततेमुळे सुरू झालेले वादाचे लोण पुण्यात पोहोचले असून पुण्यातील तीन पोलिस निरीक्षक हे बेकायदेशीररित्या जमिनींवर ताबे मारण्याच्या उद्योगात गुंतले असल्याचा खळबळजनक दावा निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

खोट्या, बनावट पुराव्याच्या आधारावर, पद –अधिकाराचा गैरवापर करून माझ्यावर तक्रार करण्यात आली असून रश्मी शुक्ला यांच्या नावाने खंडणी मागितल्याची माझ्याविरोधातील तक्रार चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामागे पुण्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांचे हितसंबंध आड येत असल्याने त्यांनी हा सामूहिक कट रचल्याचा आरोप धुमाळ यांनी केला.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारने घोळ घातला याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांना एक रिपोर्ट जाहीर केल्यानंतर धुमाळ यांचे नाव पुढे आले. शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना धुमाळ यांनी त्यांच्या नावाने 25 लाख रुपये मागितल्याचे प्रकरण चर्चेत आले. त्यावरून हरिभाऊ राठोड, सुरेश खोपडे यांनी आरोप केले होते. त्याबद्दल धुमाळ यांनी स्पष्टीकरण देताना अनेक खळबळजनक दावे केले

धनंजय धुमाळ म्हणाले, ‘तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने संदीप जाधव (रा. वीरभद्र सोसायटी, बाणेर) यांच्याकडून २५ लाख मागितल्याच्या खोट्या आरोपाखाली माझ्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती आणि निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणातील ऑडियो, व्हिडीओ रेकोर्डिंग सारखे पुरावे बनावट आणि फेरफार केलेले होते. मात्र मूळ रेकोर्डिंग ज्या स्पाय कॅमेरा, इलेक्ट्रोनिक साधनांचा वापर करून केले होते, तो मूळ पुरावा प्राथमिक चौकशी अधिकारी यांनी न मिळवता बनावट रेकॉर्डिंगच्या आधारावर चौकशी आणि कारवाई करण्यात आली. (सदरचे रेकॉर्डिंग संदीप जाधव यांनी दिनांक 20/07/2016 रोजी केले ते 02/08/2016 रोजी पर्यंत स्वताच्या ताब्यात ठेवून त्यामध्ये आवश्यक ते फेरबदल करून त्यानंतर त्याच्या अनेक बनावट रेकॉर्डिंग केलेल्या सीडीज प्रसारमाध्यमात व पोलीस आयुक्त यांना दिल्या होत्या.) यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार, अरुण सावंत आणि सुरेश मिरगे यांच्या सहभागाचीदेखील चौकशी व्हावी, अशी मागणी धनंजय धुमाळ यांनी केली आहे.

माझ्याविरुद्धचा बनावट तक्रारीअर्ज व बनावट सीडीज हे पुरावे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनीच तयार करून संदीप जाधव यांना दिले आहेत से खात्रीशीर समजले असल्याचे धनंजय धुमाळ यांनी सांगितले. बाणेर, बालेवाडीतील ज्या सर्व सामान्य लोकांच्या जमीनीवर काही पोलिसांच्या मदतीने संदीप जाधव, हेमंत गांधी आणि साथीदारांनी मारलेले बेकायदेशीर ताबे याबाबत केलेल्या तक्रारी बाबतीत संबंधित पोलिस स्टेशन डून योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्याने त्यांना आजही न्याय मिळालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिशिर कोशेयांच्या जमीनीवर संदीप जाधव व हेमंत गांधी यांनी पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर ताबा मारल्याची आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करीत होतो. संजय मुथा याच्या कागदपत्रांचा वापर करून 30 वर्षांपूर्वी टाटा मोटर्सच्या कामगारांनी घेतलेल्या जमिनीवर, प्लॉटवर संदीप जाधव, हेमंत गांधी यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने जमिनींचा ताबा बेकायदेशीररित्या घेतला होता. त्यातील एक प्लॉट हा तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आपल्या पत्नीच्या नावावर संदीप जाधव आणि हेमंत गांधी यांच्या कडून घेतला. त्या जमिनीची सरकारी किमत 90 लाख तर बाजारभावा प्रमाणे किमत ४ ते ५ कोटी रुपये होती, याचीही चौकशी करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली.

ते म्हणाले, ‘हे षड्यंत्र रचणाऱ्या संदीप जाधव, पोलीस दलातील अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करून माझ्यावर कारवाई केली याबद्दल त्यांची चौकशी करून मला दोषमुक्त करावे म्हणजे खोट्या कारवाईपायी भविष्यात माझ्यासारखा कोणाचा बळी जाणार नाही. माझ्यावरील कारवाई विरोधात मी अपील केले असून त्यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदन पाठवले आहे.

या आरोपांबाबत सुनील पवार, अरुण सावंत आणि मिरगे या अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समजली नसून ती आल्यानंतर त्यांचे म्हणणे दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.