एकतर्फी प्रेमातून अंबाजोगाईच्या तरुणीचा खून करून तरुणाची आत्महत्या
अंबाजोगाई – एकतर्फी प्रेमातून लातूरच्या तरुणाने अंबाजोगाईच्या तरुणीचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पुण्याच्या नवी सांगवीतील औंषध रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीत मंगळवारी उघडकीस आली. आदिती श्यामसंदुर बिडवे (वय १९, रा. अंबाजोगाई) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून नेर्इमोद्दीन बिल्कोसोद्दीन शहा (वय २१, रा. लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; जमिनीच्या सर्वेस विरोध करत सर्वेयर सह महिला कर्मचा-याला बेदम मारहाण
आदितीचे वडील शामसुंदर बिडवे हे सध्या नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी आहेत. यापूर्वी ते लातूर येथे कार्यरत होते. त्यावेळेस आदिती लातूर येथील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती. महाविद्यालय जवळच्या परिसरात राहणाऱ्या नेर्इमोद्दीन शहा याचे तिथपासूनच आदितीवर एकतर्फी प्रेम जडले असावे असा संशय आहे. त्यानंतर आदिती ही शिक्षणासाठी चार महिन्यांपूर्वी पुण्यातील सांगवी भागात राहणाऱ्या चुलत्यांकडे राहण्यास आली होती. ती बीए प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. बुधवारी दुपारी एक वाजता नेर्इमोद्दीन लातूरहून पुण्यातील तिच्या घरी आला. या वेळी घरी कोणी नव्हते. ही संधी साधून तो घरात घुसला आणि आदितीचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वत:ही फॅनला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा :- डोंबिवली ; खंडणीखोर भावडांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
काही वेळाने आदितीचा चुलत भाऊ घरी आल्यानंतर त्याने घराची बेल वाजवली. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला असता आदिती मृत अवस्थेत पडलेली, तर नेर्इमोद्दीन याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. बुधवारी रात्री अंबाजोगाई येथील लालनगरजवळील स्मशानभूमीत आदितीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खून आणि आत्महत्येची ही घटना २०४ क्रमांकाच्या सदनिकेत घडली. विशेष म्हणजे याच सदनिकेत यापूर्वी जोडीने मृत्यूच्या दोन घटना झालेल्या आहेत. एक वेळेस प्रेयसी व प्रियकर तर दुसऱ्या वेळेस बहिण-भावाने सोबत आत्महत्या केली होती. आता ही तिसरी घटना आहे. यामध्ये तरुणीचा खून करून तरुणाने गळफास घेतला आहे.