मुंबई आणि महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम लांबणार

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

गेल्या चार-सहा दिवसांपासून चांगले ऊन पडत असल्यामुळे पावसाळा संपला, असे वाटत असतानाच शुक्रवारी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे पावसाळा कधी संपणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी मेनगर्जानेसह पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच पाऊस माघारी कधी परतणार याचा अंदाज हवामान खात्याने अद्याप व्यक्त केलेला नाही.

पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, बीड येथे सोमवारपर्यंत तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूर, सातारा येथे शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईतून ८ ऑक्टोबर आणि महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा परतीच्या प्रवासासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचा अंदाज आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार उत्तर आणि दक्षिण कोकणात शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

सोमवार १० ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र येथे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर फार नसेल, असे वेधशाळेचे म्हणणे आहे.

आंध्र प्रदेश आणि शेजारील भागावर चक्रीय वातस्थिती सक्रिय असून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून उत्तर प्रदेशचा काही भाग, तेलंगणा, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश येथे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मुंबई आणि राज्यात पावसाळी वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
–पूर्ण–

Leave a Reply

Your email address will not be published.