दहिसर ते मिरारोड मार्गिकेच्या कारशेडसाठीची जागा लवकरच ‘एमएमआरडीए’ च्या ताब्यात येणार
मुंबई दि.१० :- दहिसर ते मिरारोड मेट्रो ९ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन, डोंगरीतील ५९ हेक्टर जागा लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात येणार आहे. या बाबतचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकतेच देण्यात आले. एमएमआरडीएकडून दहिसर ते मिरारोड दरम्यान १०.५ किलोमीटच्या मार्गिकेची उभारणी करण्यात येत असून मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा प्रश्न प्रलंबित होता.
‘बाई पण भारी देवा’ चित्रपटातील कलाकारांशी गप्पा
भाईंदर येथील राई, मुर्धा, मोर्वा येथे एमएमआरडीएने कारशेड प्रस्तावित केली होती. स्थानिकांना या जागेला जोरदार विरोध केल्याने अखेर राज्य सरकारने प्रस्तावित कारशेडची जागा काही महिन्यांपूर्वीच रद्द केली. कारशेडसाठी उत्तन, डोंगरी येथील ५९ हेक्टर जागा निश्चित केली. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.