पंतप्रधानांनी घेतला वर्षभराचा आढावा
मुंबई, दि.३० – विक्रमी गतीने दारिद्रय निमुर्लन करण्यात भारताने वेग घेतला असून, भारताच्या विकासाची जागतिक संस्थांनीही दखल घेतली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. वर्ष 2018 हे वर्ष भारतासाठी एकत्रित प्रयत्नांमुळे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, व्यवसाय सुलभीकरण, अंतराळ या क्षेत्रासाठी विक्रमी ठरले असून, या वर्षाने भारताला जागतिक नकाशावर मानाचे स्थान दिले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे ते जनतेशी संवाद साधत होते. सौर ऊर्जा आणि हवामान बदल यासारख्या क्षेत्रातल्या भारताच्या प्रयत्नांची नोंदही जागतिक स्तरावर घेतली गेल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या स्वसंरक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्यात येत आहेत. पाणी, जमीन आणि आकाश या तीनही स्थळी भारत आण्विक क्षमतेने सिद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 2018 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या, आरोग्य विमा योजनेची, ‘आयुष्मान भारत’ची सुरुवात झाली. तसेच देशातल्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा :- कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ – केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
देशातल्या जनतेच्या निर्धारामुळे स्वच्छतेचे जाळे 95 टक्क्यापेक्षाही जास्त होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. कुंभमेळा म्हणजे स्वत्व शोधाचे मोठे माध्यम आहे. मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने कुंभमेळ्याला स्थान देणे, कुंभमेळ्याचे जागतिक महत्व अधोरेखित करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रयागराज इथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात 150 पेक्षा जास्त देशातले लोक सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक समाजात खेळाचे स्वत:चे महत्व असते असे सांगून पुण्याची वेदांगी कुलकर्णी, सायकलवरुन जगप्रवास करणारी पहिली वेगवान आशियाई ठरल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. येत्या प्रजासत्ताक दिनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वच्छ आणि आरोग्यदायी भारत, समृद्धीकडे मार्गक्रमण करेल, असे सांगून उत्तम आरोग्यासाठी पोषण मूल्ययुक्त अन्न अतिशय महत्वाचे असते, असं पंतप्रधान म्हणाले. पोषणमूल्य असणाऱ्या अन्नाच्या महत्वाविषयी लहानपणापासूनच शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. लोहरी, पोंगल, मकर संक्रांत, उत्तरायण, माघबिहू, माघी, या सर्व सणांनिमित्त शुभेच्छा देतानाच हे सर्व सण पिकं, शेती, शेतकरी आणि खेड्याशी जोडले गेले आहेत, असे ते म्हणाले.