साहित्य संमेलनाध्यक्षाच्या नावावर उद्या शिक्कामोर्तब

मुंबई आसपास प्रतिनिधी

मुंबई- वर्धा येथे होणाऱ्या आगामी ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या नावावर उद्या शनिवारी (१५ ऑक्टोबर) गोवा फोंडा येथे होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या शनिवारी होणार आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निवड झालेल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

वर्धा येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महामंडळाच्या महाराष्ट्र साहित्य परिषद या घटक संस्थेने ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक सुरेश द्वादशीवार, लेखक अच्युत गोडबोले, कवी प्राध्यापक प्रवीण दवणे यांची नावे सुचविली आहेत.

मराठवाडा साहित्य परिषदेने द्वादशीवार यांच्यासह ‘बारोमास’कार सदानंद देशमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक, निग्रो साहित्याचे अभ्यासक डॉ. जनार्दन वाघमारे ही तीन नावे अध्यक्षपदासाठी सुचविली आहेत.

द्वादशीवार यांच्या नावाला तीव्र विरोध झाला तर आधी सुचविण्यात आलेल्या अन्य नावांवर विचार केला जाऊ शकतो किंवा कदाचित एखादे अन्य नावही सुचविले जाण्याची शक्यता आहे. तसे काही झाले नाही तर द्वादशीवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असे सांगितले जाते.

साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्तीनंतर गेल्या चार वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक टाळून एकमताने बिनविरोध निवड केली जात आहे. घटना दुरुस्ती झाल्यानंतर पहिल्या वर्षी हा बहुमान प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना मिळाला होता. त्यानंतर फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली होती.

उदगीर येथे एप्रिल २०२२ मध्‍ये ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.‌

दरम्यान नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना द्वादशीवार यांनी ‘ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते, आणि त्यांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही, असे वक्तव्य केले होते.

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी प्रा. द्वादशीवार यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.‌

द्वादशीवार यांचे हे वक्तव्य वर्णभेद निर्माण करणारे, भावना भडकावून दुही माजविणारे आणि विखारी आहे. अशी द्वेषमुलक भाषणे करणा ऱ्या आणि तशीच मते असणा ऱ्या माणसांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये असे प्रा. पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published.