बरेच दिवस मराठा समाज ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज आला
मुंबई दि.२९ – अखेर बरेच दिवस मराठा समाज ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज आला. आज सकाळी १०.३० वाजता मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर विधेयक आजच सभागृहात मांडलं जाणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली होती. राज्यात एकूण मराठा जनसंख्या ३१ टक्के नोंदवण्यात आली होती. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्गांतर्गत (Socialy & Economically Backword Class) मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा :- मराठा आरक्षणाबाबत कुणी राजकारण केल्यास वाईट परिणाम होतील, मराठा आंदोलकांचा इशारा
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या १६ टक्के आरक्षण दिलं जाणार आहे. राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील आणि पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के हे आरक्षण असणार आहे. मात्र, केंद्रीय सेवांमध्ये मराठा समाजाला तूर्तास आरक्षण देण्यात येणार नाही. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा :- आता सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या होणार
मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात एकमताने मंजूर झालं आहे. मराठा समाजाला राज्यात 16 टक्के आरक्षण मिळणार आहे. ‘महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांतील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधीत बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक’ असं लांबलचक नाव या विधेयकाला देण्यात आलं होतं.
महाराष्ट्रात सध्याची आरक्षणाची स्थिती
अनुसूचित जमाती (ST) – ७ टक्के
अनुसूचित जाती (SC) – १३ टक्के
ओबीसी – १९ टक्के
भटक्या जमाती (NT) – ११ टक्के
विशेष मागास वर्ग (SBC) – २ टक्के
विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपचा जल्लोष
मराठा आरक्षणाचा कृती अहवाल विधानसभेत मांडला गेल्यानंतर एकच जल्लोष सुरु झाला आहे. भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर एकच जल्लोष केला. भगवे फेटे परिधान करत आणि एकमेकांना मिठाई देऊन हा क्षण साजरा करण्यात आला. मराठा आरक्षण विधेयक सादर केल्यानंतर भाजपानं जल्लोषाची तयारी देखील सुरू केलीय. दुपारी दोन वाजता जल्लोषासाठी तयार राहण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांना सूचना आधीच देण्यात आल्या होत्या.