संपूर्ण देशात मोठ्या सिनेमा वितरक/प्रदर्शक कंपन्या असलेल्या पीव्हीआर आणि आयनॉक्स यांचे विलिनीकरण धोकादायक

मक्तेदारी

संपूर्ण देशात मोठ्या सिनेमा वितरक/प्रदर्शक कंपन्या असलेल्या पीव्हीआर आणि आयनॉक्स यांचे विलिनीकरण झाले. आता ही नवी कंपनी पीव्हीआर- आयनॉक्स लिमिटेड या नावाने ओळखली जाणार आहे.

या विलिनीकरणामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याच्या व्यवसायात यांचीच मक्तेदारी निर्माण होणार असून तेच धोकादायक आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यावरही याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.

शिव्या घालायचा सामुदायिक सोहळा, हुतात्मा होण्याचा प्रयत्न की भाजपचाच डाव…

पीव्हीआरकडे देशातील ७३ शहरातील ८७१ स्क्रीन तर आयनॉक्सकडे ७२ शहरातील ६७५ स्क्रीन आहेत. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर दोघांचे दीड हजारांहून अधिक स्क्रीन असणार आहेत. करोनामुळे दीड-दोन वर्षे चित्रपटगृहे- मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन दोन्हीही बंद होते.

आता चित्रपटगृहे सुरू झाली असली तरी आजही अनेक ठिकाणी पन्नास टक्के आसन क्षमतेची अट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मल्टिप्लेक्स॔ना गेल्या काही वर्षांत नेटप्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, झी 5 या ओटीटी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे.

त्यामुळे या दोन मोठ्या कंपन्यांनी एकत्र येऊन या ओटीटी कंपन्यांचे आव्हान स्वीकारले असावे.पीव्हीआर आणि आयनॉक्स या दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाच्या निर्णयानंतर दोन्ही कंपन्यांचे शेअर वधारले.

या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे मराठी चित्रपटांची अधिक गळचेपी होऊ शकते. तसेच काही हिंदी चित्रपटांनाही याचा फटका बसू शकतो. कोणता चित्रपट किती दिवस चालवायचा? त्या चित्रपटासाठी सोयीची किंवा गैरसोयीची वेळ कशी द्यायची?

मुळात चित्रपट प्रदर्शित करण्यास मल्टिप्लेक्स उपलब्ध करून द्यायचा की नाही? हे सगळे या नव्या कंपनीच्या हातात राहणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाच्या बाबतीत पीव्हीआर, आयनॉक्स या मल्टिप्लेक्समध्ये काय घडले, ते उदाहरण ताजे आहे.

पण हिंदीपेक्षाही मराठी चित्रपटांसाठी या दोन मोठ्या कंपन्यांचे एकत्रीकरण अधिक धोकादायक वाटते. या आधीही मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यावरून कशी गळचेपी केली जाते ते सर्वानी पाहिलेले आहे. मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्स उपलब्ध न होणे, मिळाले तर प्रदर्शनासाठी प्राईम टाईम न मिळणे, एखाद्या बड्या बॅनरच्या हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपटाला चित्रपटगृह न मिळू देणे, सुरु असलेला चित्रपट काढून टाकणे असे प्रकार घडलेले आहेत.

काही मराठी चित्रपट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरविले जातात. पण मल्टिप्लेक्समध्ये ते कधी प्रदर्शित होतात तर कधी होत नाहीत. प्रदर्शित झाले तर त्याच्या खेळाची वेळ गैरसोयीची असते.

मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित झालेच पाहिजेत यासाठी महाराष्ट्र शासनाने नियमावली जाहीर केली. मात्र अपवाद वगळता काही मल्टिप्लेक्स चालक, मालक यांनी ती धाब्यावर बसवली आहे.

त्यातून पळवाटा काढल्या आहेत. काही वेळेस काही राजकीय पक्षांकडून या प्रश्नावर आंदोलने करण्यात आली. पण चित्र काही बदललेले नाही. ठोस उपाययोजना झालेली नाही.

कधीतरी आरडाओरड झाली की राजकीय पक्षांकडून काहीतरी केले असे दाखवले जाते. नंतर पहिले पाढे पंचावन्न.

मल्टिप्लेक्समध्ये येणा-या प्रेक्षकांनी बाहेरून/घरून खाद्यपदार्थ आणले तरी चालतील, त्यांना आडकाठी करू नये, असे या संदर्भात न्यायालयात स्पष्ट केले आहे.

तसे पत्रक मल्टिप्लेक्स चालक, मालकांना पाठविण्यात येईल असे शासन यंत्रणांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आजही अपवाद वगळता मल्टिप्लेक्समध्ये आत सोडताना प्रेक्षकांना सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालावी लागते.

बहुतांश मल्टिप्लेक्स मॉल्समध्ये आहेत. मॉल्स/ मल्टिप्लेक्समधील भरमसाठ किंमतीचेच खाद्यपदार्थ खा नाहीतर खाऊ नका असा खाक्या इथे आहे.

त्यामुळे पीव्हीआर आणि आयनॉक्स या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे त्यांचा फायदा होणार असला तरी यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना याचा काय फायदा होणार आहे? मल्टिप्लेक्समधील तिकिटांचे दर कमी होणार आहेत का?

मल्टिप्लेक्समधील चित्रपटांचे ऑनलाईन तिकिट बुक करताना त्यावर आकारला जाणारा कर कमी होणार आहे का? मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी कमी होणार आहे का? मल्टिप्लेक्स/मॉल्स येथे मिळणा-या खाद्यपदार्थांच्या किंमतीवर नियंत्रण येणार आहे का?

या सर्व प्रश्नांचाही विचार होणे आवश्यक आहे. मल्टिप्लेक्स चालक, मालक, राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणा, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अन्य छोटे- मोठे वितरक यांनी एकत्र आले पाहिजे.

जाता जाता- मराठीत हल्ली भारंभार चित्रपट तयार होतात. त्यापैकी काही अपवाद वगळता अन्य मराठी चित्रपटांचा दर्जा, गुणवत्ता, सादरीकरण याचाही सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.
©️शेखर जोशी यांंच्या फेसबूक वॉल वरून, साभार

 

 

 

 

२९ मार्च २०२२

Leave a Reply

Your email address will not be published.