चित्रपट-मालिकांच्या उपराजधानीत नव्या स्टुडिओचा शुभारंभ


विजू माने यांच्या स्टुडिओ १०८चे उद्घाटन

( म विजय )
 
ठाणे – असंख्य कलावंत आणि तंत्रज्ञांचे वास्तव्य असलेल्या आणि चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाने गजबजलेल्या ठाण्यात चित्रीकरणोत्तर प्रक्रियेसाठी नव्या अद्ययावत स्टुडिओचा शुभारंभ झाला आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विजू माने यांच्या स्टुडिओ १०८ या नव्या स्टुडिओचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यात मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे वास्तव्य देखील ठाण्यात आहे. मुंबईत आउटडोअर चित्रीकरणाला मोठ्या प्रमाणावर मर्यादा असताना ठाण्यात मात्र आउटडोअर चित्रीकरणाला चांगला वाव असून आर्थिकदृष्ट्या देखील ठाण्यात चित्रीकरण करणे किफायतशीर असल्यामुळे अनेक निर्माते ठाण्याला पसंती देत आहेत. मात्र, तरीही चित्रीकरणोत्तर प्रक्रियेसाठी अद्यापही मुंबईत, विशेषतः अंधेरी परिसरातल्या स्टुडिओंकडे धाव घ्यावी लागते.
हे ओळखून ‘शर्यत’ आणि ‘खेळ मांडला’फेम प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विजू माने यांनी ठाण्यातच चित्रीकरणोत्तर प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या स्टुडिओची उभारणी केली आहे. इनडोअर चित्रीकरण, संकलन, व्हीएफएक्स (स्पेशल इफेक्ट्स), अॅनिमेशन स्टुडिओ, कलर ग्रेडिंग, सब टायटल्स अशा चित्रीकरणोत्तर संपूर्ण सेवा या स्टुडिओत उपलब्ध असून चित्रीकरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री देखील पुरवण्यात येणार आहे. तसेच, डिजिटल मार्केटिंग, सिनेमाचे टीझर व ट्रेलर मेकिंग आदी सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. चित्रीकरणोत्तर प्रक्रियेची सुविधा व्यावसायिक तत्त्वावर ठाण्यात उपलब्ध नसल्यामुळे निर्मात्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. मात्र, स्टुडिओ १०८ मुळे ही गैरसोय दूर होईल, असा विश्वास विजू माने यांनी व्यक्त केला

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email