महापालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू पाहून जी-२० शिष्टमंडळ भारावले
मुंबई, दि. २४
जी-२० परिषदेच्या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने काल (मंगळवारी) बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयास भेट दिली. मुख्यालयाची वास्तूरचना पाहून शिष्टमंडळातील सदस्य भारावून गेले.
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अन्य महापालिका अधिका-यांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे मुख्यालयात स्वागत केले.’आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत कालपासून सुरू झाली. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.
मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागालाही जी-२० सदस्यांनी भेट दिली. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने गटागटाने बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा ‘हेरिटेज वॉक’ केला. मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती, बांधकाम, वास्तूरचना, इतिहास आदींबाबत इत्थंभूत माहिती या सदस्यांना देण्यात आली.
बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयाच्या मध्यभागी असलेल्या प्रांगणात जी-२० शिष्टमंडळातील सदस्यांसाठी छोटेखानी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील पाणीपुरी, भेळ, मुंबई चाट, समोसा, वडापाव, पावभाजी, मुंबईचा मसाला चहा इत्यादी पदार्थांचा यात समावेश होता.
मुख्यालयातील कोर्टयार्ड परिसरात आलेल्या पाहुण्यांसाठी खास बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पं. भुपेंद्र बेलबन्सी यांचे बासरी वादन झाले.